नवी दिल्ली : राज्यातील आणखी एक प्रकल्प (Project) गुजरातला पळविण्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. नागपूर येथे होऊ घातलेला एअरबस (Airbus) प्रकल्प परराज्यात नेल्याचा आरोप राष्ट्रवादीसह आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यापूर्वी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात नेल्यावरुन वादंग पेटले होते. तर एअरबस प्रकल्प नेमका काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय हे पाहुयात..
आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या दिशेने भारताने मोठी झेप घेतली आहे. गुजरात राज्यातील वडोदरा येथे टाटा आणि एअसबस या दोघांच्या संयुक्त उपक्रमातून C-295 हे मोठे वाहतूक करणारे विमान तयार होणार आहे.
या महिन्याच्या अखेरीस विमान तयार करणारे युनिट सुरु होणार आहे. या विमानाचा भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे. ही माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी या उत्पादन प्रकल्पाचे उद्धघाटन करणार आहेत. संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या मते या कारखान्यात केवळ C-295 हे वाहतूक विमानचं तयार होणार नाही तर, वायुसेनेच्या गरजेनुसार आधुनिक विमान तयार करण्यात येणार आहेत.
Tata Advanced आणि Airbus यांच्या संयुक्त उपक्रमातून C-295 हे वाहतूक विमान तयार करण्यात येत आहे. 30 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची कोनशिला ठेवण्यात येईल.
युरोपच्या बाहेर पहिल्यांदाच हे विमान तयार होत आहे, त्यावरुन हा प्रकल्प भारतासाठी किती महत्वाचा हे अधोरेखित होते. सप्टेंबर 2021 मध्येच केंद्र सरकारने C-295 साठी करार केला होता. हा करार 21 हजार कोटी रुपयांचा आहे.
सरकार जुन्या एवरो 748 या विमानांच्या जागी C-295 हे विमान आणणार आहे. त्यासाठी पहिल्यांदाच खासगी कंपन्या संरक्षण विभागासाठी विमान तयार करणार आहेत. हा भारतासाठी मोठा महत्वकांक्षी प्रकल्प असेल.
करारानुसार एअरबस सुरुवातीला 16 विमान तयार स्थिती स्पेनहून पाठवणार आहे. त्यानंतर उर्वरीत 40 विमानांची निर्मिती टाटा एडवांस्ड सिस्टम आणि एअरबस मिळून करणार आहेत.
C-295 हे विमान वायुसेनेसाठी अत्यंत महत्वाचे मानण्यात येते. हे विमान एकावेळी 71 सैनिक आणि मोठं मोठे शस्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे. या विमानामुळे देशातील दुर्गम भागात रसद पाठविणे अत्यंत सोपे होणार आहे.
मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी हे विमान अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जाते. एअरबस कंपनीच्या दाव्यानुसार, या विमानासाठी कंपनीकडे आतापर्यंत 285 ऑर्डर आल्या होत्या. त्यातील 203 विमाने कंपनीने तयार केली आहेत.