नवी दिल्ली : इतिहासात पहिल्यांदाच नेपाळने भारताला सिमेंटची निर्यात (Nepal cement export to India) केली आहे. नेपाळमधून सिमेंटच्या एकूण तीन हजा गोण्या असलेली एक खेप उत्तरप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या चेकपोस्टद्वारे भारतात दाखल झाली आहे. नेपाळमधील पल्पा (Palpa Cement Industries) इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने भारताला सिमेंट पुरवले आहे. या सिमेंटचे ब्रॅंड नेम तानसेन (Tansen) असे आहे. नेपाळ सरकारने जेव्हा त्यांचे आर्थिक बजेट सादर केले, या बजेटमध्ये त्यांनी सिमेंटच्या निर्यातीला चालना देण्यासाठी सबसीडीची घोषणा केली होती. जर एखादी कंपनी नेपाळमधील कच्च्या मालाचा उपयोग करून सिमेंट तयार करेल आणि ते इतर देशांना निर्यात करेल अशा कंपनीला आठ टक्क्यांची सबसीडी देण्याची घोषणा नेपाळच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. परिणामी यंदा नेपाळमधील सिमेंटचे उत्पादन वाढले असून, जोरदार निर्यात सुरू आहे. भारताला देखील नेपाळने सिमेंट निर्यात केले आहे.
सिमेंट उद्योगाला नेपाळ सरकारने सबसीडी दिल्यानंतर आता तेथील उद्योगपती भारतासोबत व्यापार करण्यास उत्सूक आहेत. पल्पा सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचे पब्लिक रिलेशन ऑफिसर जीवन निरौला यांनी दिलेल्या माहितीनुसार पल्पा सिमेंट सिमेंट इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्राकरचे सिमेंटचे उत्पादन घेण्यात येते. तानसेन असे या कंपनीच्या सिमेंट ब्रँडचे नाव आहे. प्रति दिन 300 टन सिमेंट निर्मिती करण्याची या कंपनीची क्षमता आहे. नेपाळ सरकारने सिमेंट उद्योगाला सबसीडी दिल्यामुळे तेथील उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निर्यातीला देखील वेग आला आहे. नेपाळमधील अनेक उद्योगपतींची भारतासोबत उद्योग करण्याची इच्छा असल्याचे निरौला यांनी म्हटले आहे. कंपनीने भाराताला तीन हजार गोण्यांची पहिली खेप पाठवल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
नेपाळमध्ये जवळपास 50 हून अधिक सिमेंट कंपन्या आहेत. यातील 15 कंपन्या या सिमेंट सोबतच सिमेंटच्या इतर वस्तू देखील बनवतात. या कंपन्याची एकूण निर्मिती क्षमता 22 मिलियन टन एवढी आहे. त्यामुळे आता येथील सरकारने सिमेंट उद्योगाच्या विस्तारासाठी सिमेंट उद्योगाला सबसीडीची घोषणा केली आहे. सबसीडी जाहीर केल्यामुळे निर्यातीला वेग आला असून, भविष्यात भारताला अधिक सिमेंट निर्यात करणार असल्याचे पल्पा सिमेंटचे पीआरओ जीवन निरौला यांनी सांगितले.