केंद्र सरकार गहू निर्यात बंदीवर ठाम, 13 मे पूर्वी नोंदणी करणाऱ्या निर्यातदारांना दिलासा

| Updated on: May 17, 2022 | 3:28 PM

देशातील महागाई नियंत्रणात आण्यासाठी केंद्र सरकारने गहू निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी 13 मे पूर्वी नोंदणी केली आहे. त्याच गव्हाला निर्यातीची परवानगी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकार गहू निर्यात बंदीवर ठाम, 13 मे पूर्वी नोंदणी करणाऱ्या निर्यातदारांना दिलासा
Follow us on

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झालेला दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीपासून ते पेट्रोल, डिझेलच्या भावापर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. मात्र या सर्वांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे गव्हाच्या भाववाढीची देशासह जगभरात गव्हाचे दर वाढले आहेत. देशातील महागाई नियंत्रणात आण्यासाठी केंद्र सरकारने गहू निर्यात (Wheat exports) बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर देशभरातून टीका होत आहे. केंद्र सरकार निर्यात बंदी उठवेल आणि यंदा तरी गव्हाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र गव्हाच्या निर्यातीवर बंदी कायम राहणार असून, ज्यांनी 13 मे रोजी किंवा त्यापूर्वी गव्हाच्या निर्यातीसाठी सीमाशुल्क विभागाकडे नोंदणी केली आहे, तपासणीसाठी गहू सुपूर्द केला आहे, त्यांचाच गहू निर्यात होणार असल्याचे केंद्र सरकारकडून आज स्पष्ट करण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की 14 तारखेपासूनच्या पुढील गव्हाला निर्यातीसाठी प्रतिबंध कायम असणार आहे.

सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध

सध्या जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. खरं पहाता ही भारतासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण भारत हा रशियानंतरचा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून गहू निर्यातीबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली होती. यंदा देशातून विक्रमी गहू निर्यात केली जाईल असे म्हटले होते. मात्र गव्हाचे नवे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती पडताच केंद्राकडून गहू निर्यातीवर बंदी घाण्यात आली आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणाचा विरोध म्हणून देशभरातील अनेक बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

 

…तर जगात निर्माण होणार गव्हाची टंचाई

जगात अचानक गव्हाचे दर कसे वाढले? याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यामागे रशिया आणि युक्रेन युद्धाचे कारण समोर येते. रशिया आणि युक्रेन हे जगातील दोन महत्त्वाचे गव्हाचे निर्यातदार देश आहेत. या दोनही देशातील गव्हाला जगभरात मोठी मागणी आहे. मात्र सध्या युद्धामुळे रशिया आणि युक्रेनमधून होणारी गव्हाची निर्यात ठप्प आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देश हा भारताकडे आशेने पहात होता. मात्र केंद्राने गहू निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने जगात गव्हाचा तुटवाड निर्माण झाला आहे. भारताने निर्यात बंदीचे धोरण कायम ठेवल्यास आणि रशिया व युक्रेन युद्ध सुरूच राहिल्यास जगात मोठ्या प्रमाणात गव्हाची टंचाई जाणवणार आहे.