नवी दिल्ली : हॉलिवूडचा अवतार (Avatar Movie) चित्रपट तुम्हाला आठवतो का? या चित्रपटात दुसऱ्या एका ग्रह मालेतील एका ग्रहावर मानव जातो. तिथल्या लोकांसारखा रंग परिधान करुन त्यांच्या सारखाच दिसण्याचा प्रयत्न करतो. तिथे अनेक प्रकारच्या गोष्टींचा शोध घेतो. दुसऱ्या ग्रहावरील अनेक खनिजे, द्रव्य पदार्थ पृथ्वीवर पाठविण्यात येतात. त्याचा पृथ्वीवर कोट्यवधींचा व्यवहार होतो. तर दुसऱ्या ग्रहावर मानवासाठी एक वसती पण तयार करण्यात येते. सध्या जगातील तीन देशांनी चंद्रावर आपले पाय घट्ट रोवले आहेत. त्यात भारत आपला झेंडा गाडण्याचा प्रयत्न करत आहे. भारत चंद्रयान-3 च्या माध्यमातून बरंच काही साध्य करु इच्छित आहे. मून इकॉनॉमीचा (Moon Economy) अर्थ तुम्हाला उमगला का? भारत सुद्ध मून इकॉनॉमीचा भाग होणार आहे.
क्लबमध्ये भारताचा प्रवेश
भारताअगोदर अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर पाऊल ठेवले आहे. या देशांनी चंद्रावर सुरक्षित यान उतरवले आहे. भारताची चंद्रयान-3 मोहिम फत्ते झाली तर भारत या क्लबचा दावेदार होईल. त्यामुळे मून इकॉनॉमी मध्ये भारतासह हे देश पण दावेदार होणार आहे. कारण चंद्रावर जर काही खणिज सापडलं अथवा दुसरा महत्वाचा शोध लागला तर इतर सदस्यांना पण त्याचा फायदा होईल. चंद्रावर अजून मानवाने सखोल शोध मोहिम राबवलेली नाही. चंद्राचा अर्धा पण भाग मानवाने पाहिलेला नाही. पण येत्या काही वर्षात काही अपडेट मिळू शकते.
मून इकॉनॉमी काय आहे
चंद्रावर स्वारी करण्यासाठी अनेक देशांनी मोहिमा आरंभल्या आहेत. त्यासाठी अंतराळ मोहिमा, उत्पादन, स्पेस स्टेशन, चंद्राच्या जमिनीखालील खनिजं, चंद्र पर्यटन, चंद्रावर प्लॉटिंग अशा अनेक उलाढालीत भारताचा समावेश असेल. पीडब्ल्यूसीच्या एका रिपोर्टनुसार, चंद्रावर मानवाचे ठसे उमटल्यानंतर मून इकॉनॉमीला अच्छे दिन येतील.
तीन टप्प्यात मिशन
मून इकॉनॉमी तीन टप्प्यात काम करेल. यामध्ये पहिल्यांदा चंद्र मोहिम, त्यात संशोधन, मानव पाठवणे, पर्यटन उद्योगाची संधी शोधणे. दुसऱ्या टप्प्यात चंद्रावरील माहिती आधारे व्यावसायिक वापर करण्याची तयारी, चंद्रावर स्पेस स्टेशन तयार करणे, खनिज, द्रव्याचा शोध घेणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे आणि तिसऱ्या टप्प्यात मानवाला चंद्रावर वसविण्याची तयार करणे असे मिशन आहे.
एलन मस्क ते जेफ बेजोसपर्यत दावेदार
जगातील अनेक देश यावेळी मानवाला चंद्र मोहिमेवर पाठविण्याच्या तयारीत आहेत. भारताचे चंद्रयान 3 मोहिम पण त्याचाच भाग आहे. जर भारत चंद्रयान 3 मोहिमेत यशस्वी झाला तर भारत पण मानवाला चंद्रावर पाठवेल. अमेरिकेने 1969 मध्ये हा प्रयोग केला होता. जेफ बेजोस यांचा ‘ब्लू ऑरजिन’ आणि एलॉन मस्क ‘स्पेसएक्स’ च्या माध्यमातून मानवाला चंद्रावर पाठवणार आहे.