नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : चंदूभाई वीरांनी ( Chandubhai Virani ) यांचा प्रगतीचा आलेख अचंबित करणारा आहे. त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचे दिवस पाहीले. महिना 90 रुपये पगाराची नोकरी केली. सिनेमागृहाच्या सीट शिवल्या आणि दुरुस्त केल्या, सिनेमाचे पोस्टर्स चिकटवले. आज त्यांनी आपल्या व्यवसायात स्वत:चे नाव मोठे केले आहे. चंदूभाई केवळ मेहनत करत राहीले आणि त्यांना यश मिळत गेले. आज त्यांना त्यांच्या नावाला फारसे कोणी ओळखत नाही. परंतू त्यांचा ब्रॅंड बालाजी वेफर्स ( Balaji Wafers ) मात्र सर्वांना परिचित आहे.
बालाजी वेफर्सची सुरुवात करताना चंदुभाई वीरानी यांना मोठा संघर्ष करावा लागला. एका सर्वसाधारण कुटुंबातील चंदुभाई यांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले. चंदुभाई आणि त्यांचे भाऊ मेघजी भाई ( Meghajibhai ) आणि भीखूजी भाई ( Bhikubhai ) यांनी आधी कृषी संबंधी उत्पादने आणि उपकरणे तयार करण्याचा व्यवसाय केला. राजकोटमध्ये त्यांनी 20 हजार रुपये गुंतवणूक करून व्यवसाय सुरु केला होता. परंतू दोनच वर्षे तो चालला आणि बंद करावा लागला.
पहिला धंदा बुडाल्यानंतर अनेक संकटे आली. सिनेमाच्या हॉलची खुर्च्या दुरुस्त केल्या, पोस्टर्स चिकटवली. चंदुभाईंनी सिनेमाच्या कॅंटीनमध्ये काम केले. कोणतेही काम मेहनतीने केले. महिना 90 रुपये पगारावर काम केले. एक वेळ अशी आली की भाडे न भरल्याने त्यांना आपली जागा सोडावी लागली.
परंतू सगळे दिवस काही सारखे नसतात. एक दिवस त्यांच्या मेहनतीने त्यांनी कर्जातून मुक्ती मिळविली, दिवस पालटले. त्यांना सिनेमागृहात महिना 1000 रुपयांचे कंत्राट मिळाले. हे कंत्राट त्यांनी पूर्ण केले. कॅंटीनचे हे कंत्राट त्यांना वरदान ठरले. त्यानंतर त्यांनी दहा हजार रुपयांची बचत करीत होम मेड चिप्सचा व्यवसाय सुरु केला. चिप्सची क्लालिटी आणि चव चांगली होती. त्यामुळे व्यवसाय वाढला. सिनेमागृहाच्या बाहेरुनही मागणी वाढली. त्यानंतर त्यांनी घरात तात्पुरती शेड उभारून चिप्सचा व्यवसाय वाढविला.
चंदुभाई यांनी मग मागे वळून पाहिले नाही. काम वाढल्याने त्यांनी 1989 मध्ये जी.आय.डी.सी. ( Aji GIDC ) रिजनमध्ये गुजरातची सर्वात मोठी बटाटा वेफर्स शाखा उभारली. यासाठी त्यांनी बॅंकेतून 50 लाखांचे कर्ज घेतले. तिन्ही भावांनी 1992 बालाजी वेफर्स प्रा.लि.कंपनीची पाया रचला. सध्या कंपनीच्या चार फॅक्टरी आहेत. त्यात रोज 65 लाख किलोग्रॅम बटाटा वेफर्स आणि एक कोटी किलोग्रॅम इतर पदार्थ तयार केले जातात. आज चंदूभाई गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गोवा राज्यातील सर्वात मोठे बटाटा वेफर्सचे निर्माते आहेत.