नवी दिल्ली : मुलांच्या भवितव्यासाठी सर्वच पालक काळजीत असतात. पण चिंतेने साध्य काही होत नाही. कृतीने सर्व साध्य होते. तेव्हा मुलांच्या उज्वल भविष्यासाठी नवीन वर्षात गुंतवणुकीचा (Child Investment Plan) संकल्प घेता येईल. अनेक सुरक्षित योजनांमध्ये (Schemes) गुंतवणूक करुन तुम्हाला भविष्यातील अवाढव्य खर्चाची तरतूद करता येते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी या निधीचा वापर करता येतो. या काही योजनांमधील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.
मुदत ठेव योजना ही सुरक्षित परताव्याची अनोखी योजना आहे. या योजनेत तुम्हाला हमीपात्र परतावा मिळतो. मुलांसाठी पोस्ट खात्याच्या मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतविता येते. सध्या पोस्ट खात्याच्या पाच वर्षांच्या एफडीवर 6.7 टक्क्यांचे व्याज मिळते. म्युच्युअल फंड अथवा शेअर बाजारापेक्षा हा परतावा कमी असला तरी जोखीम मुक्त आहे.
तुम्ही 10 वर्षांसाठी एफडी कराल तर ही रक्कम जवळपास दुप्पट होईल. पाच वर्षांसाठी 5 लाखांची एफडी केली तर 6,97,033 रुपये परतावा मिळेल. एफडीचा कालावधी अजून 5 वर्षांसाठी वाढवला तर 9,71,711 रुपये मिळतील. हा कालावधी 5 वर्षांसाठी वाढवला म्हणजे 15 वर्षांसाठी गुंतवल्यास 13,54,631 रुपये मिळतील.
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या योजनेवर 7.6 टक्क्यांनी व्याज मिळते. या योजनेत कमीत कमी 15 वर्षांची गुंतवणूक करावी लागेल. 21 वर्षांनी मॅच्युअरिटीनंतर रक्कम परत मिळेल. दर महिन्याला 2000 रुपयांच्या बचतीवर तुम्हाला 10,18,425 रुपये मिळतील. तर 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15,27,637 रुपयांचा परतावा मिळेल.
पब्लिक प्रोव्हिडंड फंड या योजनेतील गुंतवणूक फायदेशीर ठरते. ही योजना 15 वर्षांची आहे. 15 वर्षांचे योगदान दिल्यावर योजनेचा कालावधी पूर्ण होईल. पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर मिळतो. योजनेत 1.5 लाख रुपये वार्षिक योगदान देता येते. 5000 रुपये महिना जमा केल्यास 7,27,284 रुपयांचे व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीनंतर 16,27,284 रुपये एवढी रक्कम मिळेल.
सध्या अनेक जणांचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे ओढा आहे. अर्थात ही जोखीमयुक्त गुंतवणूक आहे. या योजनेत तुम्हाला कम्पाऊंडिंगचा मोठा फायदा मिळतो. दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर जोरदार फायदा मिळतो. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) जोरदार परताव्याचे स्वप्न पूर्ण करु शकतो. 12, 15, 17 तर कधी कधी 20 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.