नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे (Crude Oil) भाव सातत्याने घसरत आहे. रशिया-युक्रेनच्या (Russia-Ukraine) युद्धामुळे भारताला स्वस्तात इंधनाचा खजिना मिळाला. जागतिक समुदायाच्या विरोधाला न जुमानता भारताने रशियाकडून जोरदार इंधन खरेदी केली. त्याचा फायदा झाला. भारतात गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) कसलीही दरवाढ झाली नाही. पण रशिया आणि चीनच्या खेळीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे रशिया तेल उत्पादन घटविण्याच्या तयारीत आहे. तर चीनमध्ये लॉकडॉऊन विरोधात जनक्षोभ उसळल्याने, चीनने निर्बंध सैल केले आहेत. त्यामुळे तिथे इंधनाची मागणी वाढली आहे. या दोन्ही व्यस्त प्रमाणामुळे बाजारात तेलाचा तुटवडा होऊन किंमती भडकण्याची शक्यता वाढली आहे.
कच्चे तेल आयात करणाऱ्या (Crude Oil Import) देशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. 2023 मध्ये या दोन्ही देशाच्या धोरणामुळे कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बँक ऑफ अमेरिकाने याविषयी एक अहवाल (BofA Report) तयार केला आहे. त्यात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमती (Brent Crude Oil Price) 90 डॉलर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2023 मध्ये या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची आशा धूसर झाली आहे.
युरोपियन राष्ट्रांसाठी रशियाने दर निश्चितीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला युरोपियन संघाने कडाडून विरोध केला. त्यामुळे रशियाने नवी खेळी खेळत कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा घाट घातला आहे. प्रति दिन 1 दशलक्ष बॅरल तेलाचे उत्पादन घटविण्याचा रशियाचा विचार आहे.
संकटांची मालिका येथेच संपते असे नाही. तर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह ही केंद्रीय बँक, या आठवड्यात पतधोरणानुसार, 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करु शकते. त्याचा परिणाम व्याजदर वाढीवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येईल. तर ओपेक ही तेल उत्पादक राष्ट्रांची संस्थाही 2 दशलक्ष बीपीडी क्रूड ऑईल उत्पादन कमी करणार आहे.