Mukesh Ambani : चीनच्या ‘अलिबाबा’ला रिलायन्स देणार धोबीपछाड, कंपनी रचणार इतिहास

| Updated on: Jul 19, 2023 | 7:22 PM

Mukesh Ambani : चीनच्या अलिबाबाला रिलायन्स समूह लवकरच धोबीपछाड देणार आहे. रिलायन्स आशिया खंडात इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल. काय घडत आहेत घाडामोडी

Mukesh Ambani : चीनच्या अलिबाबाला रिलायन्स देणार धोबीपछाड, कंपनी रचणार इतिहास
Follow us on

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : भारतच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) शेअर गेल्या काही वर्षात तेजीत आहेत. रिलायन्स आता त्यांची वित्तीय कंपनी स्वतंत्र करत आहे. त्यासाठी 20 जुलै ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आहे. जिओ फायनेंन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड (JFSL) असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी दिवाळीपूर्वीच शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. रिलायन्स शेअरधारकाला प्रत्येक शेअरवर JFSL चा एक शेअर मिळेल. त्यामुळे रिलायन्सच्या 36 लाखांहून अधिक शेअरधारकांना मोठा फायदा होईल. त्यामुळे रिलायन्सचा शेअर सध्या तेजीत आहे. या शेअरची व्हॅल्यू , मूल्य वाढल्यानंतर रिलायन्सचे मार्केट कॅप 19 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल. बाजारा भांडवलाच्या आधारे ही कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरेल.

अलिबाबाला धोबीपछाड

companiesmarketcap.com नुसार, चीनची दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाला (Alibaba) रिलायन्स मागे टाकेल. रिलायन्सचे मार्केट कॅप आता 231.01 अब्ज डॉलर आहे. सध्या ही कंपनी जगातील टॉप कंपन्यांमध्ये 42 व्या स्थानी आहे. चीनची अलिबाबा कंपनीचे मार्केट कॅप 234.95 अब्ज डॉलर आहे. या यादीत अलिबाबा 41 व्या क्रमांकावर आहे.

हे सुद्धा वाचा

अलिबाबामध्ये घसरण

अलिबाबाने जागतिक बाजारात चांगलीच मांड ठोकली होती. जॅक मा याने ही कंपनी स्थापन केली आहे. पण चीन सरकार विरोधात त्याचे एक वक्तव्य चांगलेच अंगलट आले. त्याला अनेक दिवस विजनवासात घालवावे लागेल. अजून मा कुठे आहे, याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. 2020 मध्ये या कंपनीचे मूल्य जवळपास 620 अब्ज डॉलर झाले होते. ते अर्ध्यांहून अधिक घसरले आहे. त्याचा फायदा आता रिलायन्सला होत आहे.

कोण-कोण आहे टॉप 10 मध्ये

  1. मार्केट कॅपनुसार, एप्पल (Apple) जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 3.047 ट्रिलियन डॉलर आहे.
  2. दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट आहे. या कंपनीचे बाजार मूल्य 2.672 ट्रिलियन डॉलर आहे.
  3. तिसऱ्या क्रमांकावर सऊदीची अरामको आहे. तिचे बाजार मूल्य 2.071 ट्रिलियन डॉलर आहे.
  4. गुगलची मुळ कंपनी अल्फाबेट चौथ्या, एमेझॉन पाचव्या क्रमांकावर आहे.
  5. एनव्हिडिया सहाव्या, टेस्ला सातव्या स्थानावर, मेटा प्लॅटफॉर्म्स आठव्या क्रमांकावर आहे.
  6. बर्कशायर हॅथवे नवव्या तर तैवानची कंपनी टीएसएमसी दहाव्या क्रमांकाव आहे.
  7. भारताची एचडीएफसी बँक 62 व्या स्थानावर तर टीसीएस 75 व्या क्रमांकावर आहे.
  8. कमाईच्या बाबतीत अरामको तर महसूलाबाबत वॉलमार्ट जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.