मुंबई : देशात महागाई (Inflation) सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे. आता यात महागाईचा आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. एक जूनपासून मुंबईत (Mumbai) टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसा इशारा टॅक्सी मेन्स युनियनच्या (Taxi Men’s Union) वतीने देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 25 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र अद्यापही टॅक्सी भाड्याच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून, भाडे स्थिर आहेत. याचा मोठा फटका हा टॅक्सीचालकांना सहन करावा लागत आहे. टॅक्सी व्यवसाय तोट्यात सुरू असून, येत्या 15 मेपर्यंत शासनाने टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी, भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये करावे अशी मागणी टॅक्सी चालक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. जर 15 मे पर्यंत भाडेवाढ करण्यात आली नाही तर एकतर्फी भाडेवाढ करू असा इशारा टॅक्सीचालकांनी दिला आहे.
एकीकडे गेल्या सहा एप्रिलपासून राज्यासह देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. सीएनजीचे दर चार रुपयांनी वाढवण्यात आल्याने सीएनजीचे दर प्रति किलो 76 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात किलोमागे तब्बल 25 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र सीएनजीचे दर वाढत असताना देखील टॅक्सीच्या भाड्यात वाढ न झाल्याने टॅक्सी चालकांचा तोटा होत आहे. त्यामुळे टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी टॅक्सी मेन्स युनियनच्या वतीने करण्यात आली आहे, संघटनेकडून भाडेवाढीसाठी 15 मेपर्यंत मुदत देखील देण्यात आली आहे. जर 15 मे नंतर देखील भाड्यात वाढ न झाल्यास एक जूनपासून एकतर्फी भाड्यात वाढ करू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
समाधानाची बाब म्हणजे गेल्या 28 दिवसांपासून राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली. मात्र सहा एप्रिलनंतर भाववाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत पेट्रोल 120.21 तर डिझेल 104.6 रुपये लिटर आहे. राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करावा असे आवाहन केंद्राकडून राज्यांना करण्यात आले आहे.