नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात 5G सेवा (5G Services) सुरु केली. त्यासोबतच रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने (Airtel) देशातील काही शहरात 5G सेवा सुरु केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य नागरिक आणि गरिबांचे दरमहा 4000 रुपये कसे वाचले याचे गणित मांडले.
पंतप्रधानांनी भारत आता तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्राहक राहिलेला नसून तो या क्षेत्रात सक्रिय भूमिका घेणार असल्याची माहिती दिली. भविष्यात तंत्रज्ञान आणि विकासात भारताची मोठी भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 2G, 3G आणि 4G सेवांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागत होते. परंतु, 5G सेवेमुळे प्रत्येक क्षेत्रात अमुलाग्र बदल होतील, असे त्यांनी सांगितले.
देशात एक GB डाटा पूर्वी 300 रुपयांना मिळत होता. परंतू आता एक GB डाटा केवळ 10 रुपयांना मिळत आहे. देशातील इंटरनेट, डाटा युझर दर महिन्याला सरासरी 14 जीबी डाटा वापरतो. त्याचा हिशोब केला असता, गरिबांना 4200 रुपये खर्च करावे लागले असते.
पण आज हाच डाटा केवळ 150 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. म्हणजेच गरिबांचे आज दर महिन्याला 4,000 रुपये बचत झाली असे गणित पंतप्रधानांनी समजावून सांगितले. यापूर्वी झालेल्या तीन औद्योगिक क्रांतीचा फायद्या देशाला घेता आला नाही. परंतु, चौथ्या क्रांतीत भारत केवळ सहभागी होणार नाही. तर तो त्याचे नेतृत्व करेल असा दावा त्यांनी केला.
तंत्रज्ञानाचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण झाल्याचा दावाही त्यांनी केला. जेव्हा कोरोनामुळे जग थांबले होते. त्यावेळी डिजिटल क्रांती आणि डेटामुळे आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले. कार्यालय बंद होते, पण लोकांनी ऑनलाईन पद्धतीने काम केले. आज चहा टपरीवाला, भाजी विक्रेत्याकडेही युपीआय पेमेंट स्वीकारण्याची सुविधा पोहचल्याचे त्यांनी सांगितले.