मुंबई : चीन (China) सध्या कोरोनाच्या (Corona) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फटक्याशी झुंज देत आहे. सर्वात वाईट परिस्थिती सध्या शांघायची (Shangai) आहे. कोरोनाच्या नव्या लाटेत इथे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 मार्चपासून येथे कडक टाळेबंदी (Lockdown) लागू करण्यात आली आहे. परिणामी लोकांना आता खाण्या-पिण्याच्या वस्तूंची कमतरता भासू लागली आहे. कडक लॉकडाऊनमुळे शांघाय बंदरात (Shanghai Port) हजारो कंटेनर जमा झाले आहेत. शांघायमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे शेकडो जहाजं बंदराबाहेर खोळंबली आहेत. टाळेबंदीमुळे सामानाची आवकजावक थांबली आहे, त्यामुळे पुरवठा साखळीवर (Supply Chain) विपरीत परिणाम झाला आहे. शांघाय हे जगातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे. येथे दरवर्षी सुमारे 4 ते 5 कोटी कंटेनर हाताळले जातात. मात्र आता लॉकडाऊनमुळे नवे संकट ओढावले आहे. त्याचा विपरीत परिणाम चीनवर दिसू लागला आहे.
शांघाय हे चीनचे आर्थिक केंद्र आहे आणि जगातील सर्वात व्यस्त बंदर ही आहे. कडक लॉकडाऊनमुळे शांघाय बंदरात शेकडो जहाजांनी नांगर टाकले आहेत. शांघाय बंदरातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, ज्यामुळे माल उतरवणे आणि चढवणे जिकिरीचे काम झाले आहे. याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे. माल पोहोचण्यासाठी विलंब झाला तर महागाई वाढण्याचाही धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अहवालानुसार, चीनच्या शांघाय बंदराबाहेर 500 हून अधिक जहाजं अडकली आहेत. या जहाजांमध्ये ठेवलेले कंटेनर उतरवायलाही वेळ लागत आहे. बंदरातील कामे बंद नाहीत, मात्र कर्मचारी नसल्याने माल उतरत नाही आणि माल उतरला तरी त्याची वाहतूक करण्यासाठी ट्रकचालकच नाहीत. एवढे सगळे होऊनही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग लॉकडाऊनमध्ये किंचितही शिथिलता देण्यास तयार नाहीत.
शांघाय बंदर हे जगातील सर्वात व्यस्त बंदर आहे. येथे दरवर्षी सुमारे 4 ते 5 कोटी कंटेनर हाताळले जातात. मात्र आता लॉकडाऊनमुळे नवे संकट ओढावले आहे. त्याचा परिणाम चीनवर दिसू लागला आहे. येथील लोकांसाठी खाण्या-पिण्याची कमतरता आहे. सुपरमार्केटमधील शिधा संपत चालला आहे. आवश्यक कच्चा माल मिळत नसल्याने कंपन्यांनी उत्पादनही बंद केले आहे. टेस्लाने 28 मार्च रोजी आपल्या शांघाय कारखान्यातील काम थांबवले आहे.
अमेरिकेनंतर भारत आपला सर्वाधिक व्यवसाय चीनबरोबर करतो. एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत भारत-चीनमध्ये 7.80 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला. त्यापैकी 6.33 लाख कोटींच्या मालाची आयात करण्यात आली असून 1.47 लाख कोटींची निर्यात झाली आहे. 2020-21 मध्ये भारत आणि चीन यांच्यात 6.40 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.
फार्मा उद्योग : शांघाय बंदराबाहेरील समुद्रात होणाऱ्या कोंडीचा परिणाम भारताच्या फार्मा उद्योगावरही होऊ शकतो. औषधांच्या कच्च्या मालासाठी भारत चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारने दिलेल्या उत्तरानुसार भारत चीनमधून 68% पेक्षा जास्त API (औषधांसाठी कच्चा माल) आयात करतो. एका वर्षात भारताने चीनकडून 1,464 कोटी रुपयांच्या एपीआयची आयात केली आहे.
इतर बातम्या
Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत