नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : गेल्या काही वर्षांत देशातील श्रीमंतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच काही थांबले होते. कोरोनाचे रौद्र रुप संपूर्ण विश्वाने अनुभवले. भारतासाठी त्याचा अनुभव वेगळा नव्हता. यामुळे अर्थचक्र जवळपास थांबले होते. पण त्यावर भारताने लस उत्पादन करुन झपाट्याने आगेकूच केली. कोरोनानंतर सर्वच क्षेत्रात पुन्हा तेजीचे वारे आले. भारतात नवश्रीमतांची (Rich Taxpayers) संख्या वाढली. करोडपती करदात्यांची संख्या जास्त आहे. आयकर खात्याच्या आकड्यांनी ही बाब समोर आणली आहे. पूर्वीपेक्षा करोडपती करदात्यांची संख्या वाढल्याचे आकडेवारी सांगते. या तीन वर्षांत करोडपतीची संख्या झपाट्याने वाढली आहे. भारतात स्टार्टअपचे प्रमाण वाढले आहे. युनिकॉर्नचे प्रस्थ झाले आहे. अर्थव्यवस्था (Economy) झेपावत आहे, त्याचा हा परिणाम आहे.
करोडपती करदाते
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी समोर आणली आहे. त्यामध्ये नवश्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. गेल्या 3 वर्षांत 57,591 नवीन करोडपती करदाते समोर आले आहेत. त्यांची कमाई एक कोटींहून अधिक आहे. नवीन बदलांचा हा परिणाम असल्याचे अनेकांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते कर भरण्याविषयी केंद्र सरकारने अनेक सुविधा दिल्या आहेत. उत्पन्न वाढल्याने तसेच नवउद्योजकांमुळे, स्टार्टअपमुळे नवश्रीमंतांची फौज उभी झाली आहे.
काय सांगते आकडेवारी
एकदाच संख्या होती कमी
गेल्या तीन वर्षांत कोरोनाचा परिणाम दिसून आला. देशात काही महिने लॉकडाऊन होता. देशातील कारखाने, उद्योग आणि उत्पादन होणारी ठिकाणं जवळपास ठप्प होती. अनेक जणांनी रोजगार गमावले होते. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एक कोटींहून अधिकची कमाई करणाऱ्या करदात्यांची संख्या कमी म्हणजे 81,653 इतकी झाली होती.
या कारणांमुळे वाढले कोट्याधीश करदाते
कोट्याधीश करदात्यांची संख्या झपाट्याने वाढण्यामागे काही कारणे आहेत. कर तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांपासून करदाते, उत्पन्न आणि कर यांचे आकडे संकलीत करण्याची प्रक्रिया पारदर्शी आणि प्रभावी झाली आहे. शेअर बाजार तेजीत आहे. स्टार्टअप कंपन्यांचे वारे वाहत आहेत. पगारात वाढ झाली आहे. तर ऑनलाईन माध्यमातून कमाई करणारे पण झपाट्याने वाढले आहेत.