नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या खेळीने अनेक अर्थव्यवस्थांना मोठा झटका बसणार आहे. या अर्थव्यवस्था खिळखिळ्या होण्याची दाट शक्यता आहे. ओपेक प्लस आणि रशियाने दबावतंत्राचा एक पत्ता टाकला आहे. पण अजून पत्ते त्यांनी उघडले नाहीत. अमेरिकेसह युरोपवर दबावतंत्राचा वापर म्हणून कच्चा तेलाचे उत्पादन (Reduce of Crude Oil) घटविण्यात आले आहे. 1973 साली ओपेक संघटनेने अमेरिकेचा व्यवहार ठप्प पाडला होता. इतकी ताकद या देशांमध्ये आहे. तेल उत्पादनात कपात केल्याचा निर्णय सर्वांसाठीच त्रासदायक आहे. विकसीत, विकसनशील देश काही दिवस नक्कीच हातपाय मारतील. पण गरिब देशांचा तर या खेळीत खुर्दा होणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढल्यास या देशांना मोठा फटका बसेल.
किती केली कपात
गेल्या रविवारी, एक आठवड्यापूर्वी ओपेकसह इतर तेल उत्पादक देशांनी तेलाचे 1.16 दशलक्ष बॅरल प्रति दिवस उत्पादन कपात केले. अर्थात हा जोर का झटका हळूवारपणे देण्यात आला. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच देशांच्या तोंडचे पाणी पळाले. अर्थात हा दबावतंत्राचा भाग आहे. रशियाने गेल्या महिन्यातच जूनपर्यंत तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय जाहीर केला होता.
किती महागणार
सौदी अरबसह 23 देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी याविषयीची घोषणा करण्यात आली. हे सर्व देश मिळून 19 कोटी लिटर कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात करतील. त्यामुळे इंधनाची किंमती प्रति बॅरल 10 डॉलरपर्यंत वाढतील. त्याचा भारतासह जगावर थेट परिणाम होईल. म्हणजे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल-डिझेल महाग होईल.
तर फटका
ओपेक सह इतर तेल उत्पादक देशांच्या निर्णयामुळे सर्वांच्या कपाळावर आठ्या आल्या आहेत. जर कच्चा तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरल झाले तर सर्वच देशांना त्याचा फटका बसेल. पण खास करुन भारत, जपान आणि दक्षिण कोरियाला त्याचा फटका बसेल. कारण या देशात पेट्रोलियम उत्पादन कमी आहे. त्यांच्याकडे स्त्रोत कमी आहे. जपान एकूण गरजेच्या 80 ते 90 टक्के कच्चे तेल मध्यपूर्व देशातून आयात करतो. तर दक्षिण कोरिया कच्चा तेलासाठी इतर देशांवर 75 टक्के अवलंबून आहे. भारताची परिस्थिती पण अशीच आहे.
भावात चढउतार
फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती 139 डॉलर प्रति बॅरल झाल्या. 2008 नंतर पहिल्यांदाच किंमती एवढ्या वाढल्या होत्या. अमेरिका आणि रशियाने त्यांचे राखीव कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवले. त्यानंतर किंमतीत घसरण झाली. त्यामुळे मार्च 2023 मध्ये किंमती घसरुन 75 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या.