नवी दिल्ली : भारतीयांना पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) कमी होण्याची प्रतिक्षा आहे. पण अद्यापही सरकारी तेल कंपन्यांनी याविषयीचा निर्णय घेतला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती 10 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर (Lowest Level) पोहचल्या आहेत. आता या किंमती पुन्हा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या किंमती किती रुपयाने उतरतील याविषयीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड (Brent Crude) तेलाचे भाव सोमवारी 2.6 डॉलर/बॅरल म्हणजेच 3 टक्क्यांहून कमी झाले. हा भाव 80.97 डॉलर प्रति बॅरल होता. या वर्षाच्या सुरुवातीला 4 जानेवारीनंतर हा सर्वात कमी भाव आहे. त्यामुळे कंपन्यांचा खर्च कमी झाला आहे.
ब्रेंट क्रूडमध्ये आलेली किंमतीतील घसरणीमुळे भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. भारतीय कंपन्या जे कच्चे तेल खरेदी करतात, त्यांचा खर्च आता 112.8 डॉलर प्रति बॅरलवरुन 82 डॉलर प्रति बॅरलवर येऊन ठेपला आहे. त्याचा फायदा कंपन्यांना होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कच्चा तेलावर खर्च कमी झाल्याने भारतीय तेल उत्पादक कंपन्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच कमी भावात इंधन उपलब्ध होईल.
भारतीय तेल कंपन्यांना 30 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा पेट्रोल-डिझेल मागे नुकसान होत असल्याचा दावा कितपत टिकतो, हे लवकरच समोर येईल. पण या डाटाच्या आधारे तेल कंपन्यांवर भाव कमी करण्याविषयीचा दबाव वाढला आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांना गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त मिळत असल्याने, पेट्रोलच्या भावात 6 रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या दरात 5 रुपये प्रति लिटर घसरण होण्याची शक्यता आहे. आता हा फायदा कधी मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.