शेअर बाजाराला वाकुल्या दाखवणा-या क्रिप्टो क्रेझेंचे नशीब ही फार काही जोरावर निघाले नाही. शेअर बाजारात(Share Market) गेल्या अनेक दिवसांपासून पडझडीचे (Crash) सत्र सुरु आहे. गुंतवणुकदारांचे पानीपत झाले आहे. झटपट श्रीमंतीसाठी अनेक तरुण क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीसाठी पुढे आले होते. त्यात सरकारने कर लावल्याने लवकरच क्रिप्टो करन्सीला(Cryptocurrency) ही राजाश्रयाच्या अफवा पसरल्या होत्या. पण सर्वच हवेतल्या गप्पा निघाल्या. शेअर बाजारात गुंतवणुकदारांच्या गुंतवणुकीवर पार नुकसानीचा फेरा फिरला. गुंतवणुकदारांचे 18 लाख कोटी रुपये बुडाले. या पडझडीत क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकादारांचा ही समावेश आहे. त्यांचे ही 22 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. जवळपास 7 महिन्यात सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉईनची(Bitcoin) व्यापारात लागोलाग पिछेहाट सुरुच आहे. बिटकॉईनची सध्या 65 टक्क्यांनी पडझड झाली आहे.
क्रिप्टोत जणू भूकंप आला आहे. गुंतवणुकदारंच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या आठवड्यात क्रिप्टो करंन्सीचे एकूण मार्केट कॅप हे तब्बल एक लाख कोटी डॉलरने घसरले आहे. 10 जानेवारी रोजी क्रिप्टोचा मार्केट कॅप 1.87 लाख कोटी डॉलर इतके होते. या शनिवारी त्याचे मार्केट मूल्य अवघे 88 हजार कोटी डॉलरवर येऊन आपटले. केवळ सात दिवसांत क्रिप्टो बाजारात लोकांचे जवळपास 30 हजार कोटी डॉलर म्हणजेच 22 लाख कोटी रुपये बुडाले. सर्वात मोठी करन्सी बिटकॉईन आणि त्यानंतरची इथेरियममध्ये जवळपास 30 टक्क्यांची घसरण झाली.
सध्या जगातील सर्वात मोठी क्रिप्टो करन्सीची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे. शनिवारी एका बिटकॉईनची किंमती 20,390 रुपयांच्या जवळपास होती. एक काळ असा ही होता की बिटकॉईन त्याच्या उच्चस्तरावर म्हणजेच 68 हजार डॉलरवर होती. ही स्थिती नोव्हेंबर 2021 मध्ये होती. परंतू, त्यानंतर घरघर लागलेला बिटकॉईन तंदुरुस्त झालाच नाही. बिटकॉईन सध्या 65 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या सात दिवसांतच त्यात जवळपास 30 टक्क्यांची घसरण झाली आहे.
क्रिप्टो करन्सीमधील दुसरं सर्वात मोठं चलन आहे, इथेरियम. इथेरियमच्या व्यापाराचा आलेख बघता, यामध्ये ही गुंतवणुकदारांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. गेल्या सात दिवसांत 35 टक्क्यांची घसरण झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये इथेरियम 4600डॉलरवर पोहचला होता. शनिवारी इथेरियमचा दर 1074 डॉलरवर घसरला. क्रिप्टोच्या यादीतील दहावं महत्वाचे चलन डॉगकॉइन 80 टक्क्यांनी घसरला आहे. जर 2021 मध्ये तुम्ही या करन्सीत एक लाखांची गुंतवणूक केली असती तर आज या एक लाखांचे 15 हजार रुपये उरले असते.