GDP | या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील चालू खात्यातील तूट (Current Account Deficit) एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ( GDP) 5 टक्क्यांपर्यंत वाढेल, अशी भीती रेटिंग एजन्सी ‘इक्रा’ने (ICRA) व्यक्त केली आहे. व्यापार तूट सातत्याने वाढत असल्यामुळे चालू खात्यावरील तूट वाढणार आहे.
ऑगस्टमध्ये (August) देशाची व्यापार तूट वाढून 28.68 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आयातीत 36.8 टक्के वाढ झाल्याने आणि निर्यातीत 1.2 घट झाल्यामुळे व्यापार तूट वाढली आहे.
इक्रा रेटिंग एजन्सीने एका अहवालात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत चालू खात्यातील घट ही आत्तापर्यंतच्या सर्वात विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
पहिल्या तिमाहीत चालू खात्यावरील तूट ही 30 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. मात्र दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 41 ते 43 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
हा आकडा जीडीपीच्या 5 टक्के असेल, जो 2011-12 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीनंतरचा दुसरा सर्वोच्च स्तर असेल.
पहिल्या दोन महिन्यांतील ( जुलै-ऑगस्ट) मासिक सरासरी व्यापारी तूट ही 29.3 अब्ज डॉलर होती. पहिल्या तिमाहीत हा आकडा सरासरी 23.5 अब्ज डॉलर इतका होता.
देशांतर्गत मागणी वाढल्याने आयातीत झालेली वाढ आणि जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहार मंदावल्यामुळे निर्यात कमी झाल्याने व्यापार तूट वाढली आहे.
या रेटिंग एजन्सीनुसार, 2022-2023 या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट 120 अब्ज डॉलर (GDPच्या 3.5 टक्के) या आत्तापर्यंतच्या सर्वात विक्रमी पातळीवर पोहोचू शकते. तर 2021-2022 या आर्थिक वर्षात ही तूट 38.7 अब्ज डॉलर ( GDPच्या 1.2 टक्के) इतकी होती.