GOLD SALE : सोन्याच्या मागणीत घसरण; सराफा व्यापाऱ्यांना ग्रामीण भागच तारणार?

| Updated on: May 10, 2022 | 5:40 AM

यंदा सराफा व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढला आहे, मात्र सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे चित्र आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे व्यवसायात वाढ झाली आहे.

GOLD SALE : सोन्याच्या मागणीत घसरण; सराफा व्यापाऱ्यांना ग्रामीण भागच तारणार?
सोन्याच्या मागणीत घसरण
Follow us on

अक्षय तृतीयेच्या (Akshay Tritiya) दिवशी सराफा बाजारात थोडासा झगमगाट दिसून आलाय, यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी सराफा बाजारात 15 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याची माहिती ज्वेलर्स असोसियशन कॅटनं दिली आहे. कोरोनाकाळाच्या (Corona) अगोदरच्या वर्षासोबत तुलना केल्यास ही उलाढाल 50 टक्के जास्त आहे. 2019 मध्येही दहा हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. यंदा 15 हजार कोटींची उलाढाल झाली आहे, मात्र असे असले तरीही सोन्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. 2019 मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा दर 31,700 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता, आता सोन्याचा भाव (Gold prices) 50 हजार 700 रुपयांच्यावर आहे, म्हणजेच सोन्याच्या भावात 60 टक्के वाढ झालीये. दोन वर्षांपूर्वीच्या भावानुसार 50 टक्के व्यवसाय वाढलाय. म्हणजेच 2019 मधील विक्रीशी तुलना केल्यास यंदाच्या अक्षय तृतीयेला सोन्याची म्हणावी तेवढी विक्री झाली नाही. भाव वाढल्यानंच व्यवसायात वाढ झालीये, सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांची संख्या रोडावली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

सोन्याच्या मागणीत घट

अक्षय तृतीयेला उलाढालीत वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, सोन्याचा भाव पन्नास हजार रुपयांच्यावर असल्यानं 2019 च्या तुलनेत ग्राहकांची संख्या कमी होती, अशी माहिती ज्वेलरी असोसियशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी दिली आहे. म्हणजेच सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे अक्षय तृतीयेला ग्राहकांची संख्या कमी होती. दागिन्याच्या विक्रीतही घट झाली आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिसऱ्या महिन्यात सोन्याच्या आयातीमध्ये सुद्धा घट झाली आहे. भारतात दागिन्याच्या मागणीत 26 टक्के घट होऊन 94.2 टन झाली आहे, तर सोन्याच्या आयातीमध्ये 55 टक्के घट होऊन आयात 147.2 टनांवर आली आहे. अशी माहिती वर्ल्ड गोल्ड काउंसिलनं दिलीये. त्यामुळेच जोपर्यंत सोन्याचे दर कमी होणार नाहीत, तोपर्यंत सराफा बाजारात झगमगाट येणार नाही. सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता कमी आहे, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

व्यापाराची ग्रामीण भागावर भिस्त

यंदा सोन्याच्या दरात फार मोठी घसरण होणार नाही, सोन्याचा भाव 49 हजार ते 53 हजार दरम्यान राहण्याचा अंदाज ब्रेकिंग फर्म ट्रस्टलाइनचे राजीव कपूर यांनी वर्तवला आहे.आता खरिपाच्या हंगामावरच सराफा बाजाराचं भविष्य अवलंबून आहे. हमीभावापेक्षा जास्त भाव आल्यानंतरच शेतकऱ्यांकडे पैसा येऊ शकतो. ग्रामीण भागात देखील लग्नासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. दागिन्याच्या एकूण मागणीपैकी ग्रामीण भागातून दागिन्याची मागणी सुमारे 60 टक्के आहे. त्यामुळे कोरोना महामारीमुळे त्रस्त असलेल्या सराफा व्यापाऱ्यांची आशा आता फक्त ग्रामीण भागावर टिकून आहे.