गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअर्समध्ये घसरण; गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण, चूक नेमकी कुठे झाली?

| Updated on: May 03, 2022 | 5:30 AM

2021 च्या ऑक्टोबरमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजचा शेअर्स उच्चांकी पातळीवर गेला, त्यावेळी गुंतवणूकदारांनी खूप नफा कमावला. मात्र अचानक गोदरेजच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअर्समध्ये घसरण; गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण, चूक नेमकी कुठे झाली?
Follow us on

दहा ते अकरा वर्षांपूर्वी देशात बांधकाम व्यवसायात (Construction business) मोठ्या प्रमाणात तेजी होती. बिल्डरांवर (Builder) कोणतेही निर्बंध नव्हते, घरांच्या किंमतीही गगनाला भिडल्या होत्या. मग बांधकाम व्यवसायाचा फुगा फुटला आणि बिल्डर देशोधडीला लागले. वाढते कर्ज, थकबाकी, न्यायालय, रेरा आणि तुरुंगवासाची वेळ बिल्डरांवर आली. बांधकाम क्षेत्रात मंदी आली आणि भावातही घसरण झाली. इथूनच बांधकाम व्यवसायाची नवीन गोष्ट सुरू झाली. रेराच्या कडक नियमानंतर पुन्हा गुंतवणूकदारांना आशेची किरणं दिसू लागली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रातील चित्र बदलू लागल्यानं पुन्हा एकदा हे क्षेत्र नव्याने भरारी घेत आहे. बाजारात (Market) घर खरेदीदारांची संख्या वाढत असून, बांधकाम व्यवसायिक गुंतवणूकदारांना सोनरी भविष्याचं स्वप्न दाखवण्यात यशस्वी ठरल्याने गुंतवणुकीत अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे.

चूक कुठे झाली?

बक्कळ कमाईच्या आशेने राहुलने गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये मोठी रक्कम गुंतवली. कोरोनाकाळात वर्क फॉर्म होममुळे मोठ्या घरांची मागणी वाढल्याची आकडेवारी त्याने पाहिली होती. वाढणारी अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांवर जोर यामुळे बांधकाम व्यवसाला पुन्हा झळाली येणार असं दिसत होतं. इकॉनमी, चकाकणारं इन्फ्रा यातून बांधकाम क्षेत्राचे दिवस बदलणार असं वाटत होतं. पण आज वस्तुस्थिती वेगळीच आहे. कुठं चूक झाली हे राहुलच्या अद्याप लक्षातच येत नाही. राहुलने वर्षभरापूर्वी गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये केलेली गुंतवणूक आज 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. वर्षभरात गुंतवणुकीत दुप्पटीनं-तिप्पटीनं वाढ होईल, अशी आशा त्याला होती. मात्र, आता आणखी तोटा होणार नाही ना ? अशी भिती राहुलला वाटतेय. बांधकाम उद्योगाच्या वेगाला का ब्रेक लागलाय? की गोदरेज प्रॉपर्टीजमध्येच काही मूलभूत समस्या आहेत? जेव्हा त्याने गोदरेज प्रॉपर्टीज म्हणजेच GPL चे शेअर्स खरेदी केले तेव्हा ते 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 2,598 रुपयांवर होते. आता शेअर्समध्ये 40 टक्के घसरण होऊन 1,571 रुपयांवर आले आहेत. शेअर्समध्ये घसरण होत असल्यानं राहुल गोंधळला गुंतवणुकीचं भविष्य समजून घेण्यासाठी त्याने थेट त्याच्या आर्थिक सल्लागाराची मदत घेतली आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअर्समध्ये घसरण का झाली?

2021 च्या ऑक्टोबरमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजचा शेअर्स उच्चांकी पातळीवर गेला, त्यावेळी गुंतवणूकदारांनी खूप नफा कमावला. उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर गुंतवणूकदारांना नफा कमावण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतर डिसेंबरच्या त्रैमासिकात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक 0.4 टक्क्यांनी कमी केली. त्यातच कंपनीनं घेतलेल्या काही निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं. गोदरेजनं डीबी रिअॅल्टीमध्ये गुंतवणूक करण्याच्या निर्णय घेतल्यानं गुंतवणूकदार घाबरले होते. डीबी रिअॅल्टीचे 400 कोटींचे शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. तसेच झोपडप्ट्टी धारकांसाठी घर बांधून देण्यासाठी कंपनीनं 300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तिसऱ्या त्रैमासिकात गोदरेज प्रॉपर्टीजच्या विक्रीमध्ये तब्बल 22 लाख स्केअर फूटांची घसरण झाली आहे. या आधीच्या त्रैमासिकात हीच विक्री 36 लाख स्केअर फूट एवढी होती. म्हणजेच विक्रीत विक्रमी घट झालीये. मात्र दिलासादायक गोष्ट म्हणजे तिसऱ्या त्रैमासिकात विक्री कमी होत असली तरीही बुकिंगमध्ये वाढ झालीये. मोठ्या शहरांसह कंपनी लहान शहरांमध्ये गुंतवणूक करत आहे. नुकतंच गोदरेज प्रॉपर्टीजनं नागपूरमध्ये गृहनिर्माण प्रकल्पासाठी 58 एकर जमीन खरेदी केली आहे, तसेच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्येही गृहनिर्माण प्रकल्प बांधणार आहे. याचा कंपनीला भविष्यात फायदा होऊ शकतो.