नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) हा पैशांची खाण आहे. अभ्यास आणि नियोजनाआधारे अनेक जण करोडपती झाले आहे. पण कुठे आणि कधी गुंतवणूक करायची हे सूत्र त्याला कळायला हवे. कंपन्याचा अभ्यास, त्यांच्याशी संबंधित घडामोडी, बाजाराची चाल याविषयी अपडेट राहता आले तर तुम्हाला शेअर बाजारातून कमाई करता येते. भारतीय शेअर बाजाराने कात टाकली आहे. डिजिटलायझेशनमुळे खूप बदल झाला आहे. तंत्रज्ञान हाती आल्याने अगदी सहज कुठूनही मोबाईल ॲपच्या माध्यमातून ट्रेडिंग करता येते. आता तर तुम्ही अमेरिकेतील शेअर बाजारात ही घर बसल्या ट्रेडिंग करु शकता. जागतिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करुन फायदा मिळवू शकता.
असे करा ट्रेडिंग
अमेरिकन बाजारात ट्रेडिंगचा (US Stock Trading) फायदा घ्यायचा असेल तर म्युच्युअल फंड हा सर्वात चांगला पर्याय आहे. अनेक आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड स्कीममध्ये (International Mutual Fund Scheme) गुंतवणूक करता येईल. त्याआधारे तुम्ही पोर्टफोलिओत अमेरिकन शेअरचा समावेश करु शकता. याशिवाय भारतीय गुंतवणूकदारांसमोर एक्सचेंज ट्रेडेड फंडचा (Exchange Traded Fund) पर्याय आहे. भारतीय गुंतवणूकदार ईटीएफ (ETF) वा फंड ऑफ फंड्स (Fund Of Funds) या माध्यमातून अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेड करु शकता.
एनएसईचा हा उपक्रम महत्वाचा
तुम्हाला अमेरिकन शेअर बाजारात थेट ट्रेड करायचा असेल तर त्याची पण सोय आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज (NSE International Exchange) त्यासाठी मदत करेल. देशातील सर्वात मोठा शेअर बाजार एनएसई च्या (NSE) मदतीने तुम्ही टॉप अमेरिकन शेअरमध्ये ट्रेड करु शकता. त्यासाठी एनएसईने गेल्या वर्षी मार्च महिन्यात अमेरिकेतील टॉप 8 कंपन्यांसह सुरुवात केली.
या कंपन्यांमध्ये मिळते सुविधा
एनएसईच्या या सुविधेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जगातील सर्वात मोठी कंपनी ॲप्पल, गुगलची मुळ कंपनी अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, फेसबुकची मुळ कंपनी मेटा इंक, नेटफ्लिक्स, वॉलमार्ट आणि एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्लाच्या शेअरची खरेदी-विक्री करता येईल.
एनएसईची सुविधा
एनएसईने काही दिवसांपूर्वी गिफ्ट सिटी (Gift City) मध्ये एनएसई आयएफएससी (NSE IFSC) नावाने आंतरराष्ट्रीय एक्सचेंज (NSE International Exchange) उपकंपनी तयार केली होती. त्याआधारे अमेरिकन कंपन्यांच्या शेअरच्या बदल्यात डिपॉझिटरी रिसीट (Depository Receipt) तयार करण्यात येते.
करावे लागेल हे काम
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर गुंतवणूकदारांना एनएसई आयएफएससी मध्ये स्वतंत्र डीमॅट खाते (Demat Account) उघडावे लागते. एका भारतीय गुंतवणूकदाराला अमेरिकन कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त 1.9 कोटी रुपये गुंतवणूक करता येते. या बाजारात सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री 8:30 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 वाजे पर्यंत ट्रेडिंग करता येते.