नवी दिल्ली : एकीकडे महागाईमुळे जनता हैराण असताना आता दुसरीकडे येत्या 1 जूनपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मर्यादा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे. (Domestic airlines fares Increase by 15 Percent from 1 June Government orders)
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पन्न घटलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विमान कंपन्यांना मदत होणार आहे. देशातील हवाई उड्डाण कालावधीच्या आधारे विमान प्रवासाच्या भाड्याच्या कमी आणि उच्च मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. ही मर्यादा गेल्यावर्षी 25 मे रोजी लॉकडाऊन उघडण्याच्या वेळी निश्चित केली गेली होती.
नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या आदेशानुसार, 40 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासाचे साधारण भाडे हे 2,300 रुपये इतके असते. मात्र आता त्यात 13 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना 40 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासासाठी 2600 खर्च करावे लागणार आहेत. तर 40 मिनिटांपासून 60 मिनिटांपर्यंत विमान प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 2,900 रुपयांऐवजी 3,300 रुपये मोजावे लागतील.
गेल्यावर्षी मे महिन्यात DGCA ने देशांतर्गत उड्डाणांसाठी एकूण 7 फेअर बँडची घोषणा केली होती. हे 7 बँड प्रवासाच्या वेळेवर आधारित आहेत. यातील पहिला बँड 40 मिनिटांपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. तर उर्वरित बँड अनुक्रमे 40-60 मिनिटे, 60-90 मिनिटे, 90-120 मिनिटे, 120-150 मिनिटे, 150-180 मिनिटे आणि 180-210 मिनिटे प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांसाठी आहेत.
यात 60-90 मिनिटे, 90-120 मिनिटे, 120-150 मिनिटे, 150-180 मिनिटे आणि 180-210 मिनिटे यांच्या तिकीटाचे दर अनुक्रमे 4,000, 4,700, 6,100, 7,400 आणि 8,700 रुपये इतके आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं आता 30 जूनपर्यंत रद्द ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. नुकतंच डीजीसीएकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात जाणाऱ्यांसाठीची विमानं ही 30 जूनपर्यंत बंद राहतील.
दरम्यान आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानसेवा मात्र यातून वगळण्यात आली आहे. त्यामुळे ज्या देशांसाठी air bubble च्या अंतर्गत ही हवाई सेवा सुरु आहे, त्यांच्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ही 31 मे पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण वंदे भारत मिशन आणि ट्रॅव्हल बबलअंतर्गत सोडण्यात येणाऱ्या एअरलाईन्सवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. या विमान सेवा पूर्वीप्रमाणेच सुरु राहील. (Domestic airlines fares Increase by 15 Percent from 1 June Government orders)
संबंधित बातम्या :
GST परिषदेच्या बैठकीत मोठी घोषणा, कोविडशी संबंधित वस्तूंवर 31 ऑगस्टपर्यंत आयात शुल्क माफ
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेला दंड, RBI नियमांचे उल्लंघन करणं भोवलं