नवी दिल्ली : होळीच्या अगोदरच मोठी आनंदवार्ता आली आहे. देशात खाद्यतेलाचे दर (Edible Oil Price) पुन्हा एकदा घसरले आहे. खाद्यतेलाच्या आघाडीवर दिलासा मिळाल्याने नागरिकांना अनेक तळीव पदार्थ चवीने खाता येतील. पुरी, कचोरी, समोसे, पापड, भजे घरीच तळता येतील. त्यासाठीचा खर्च आता वाचणार आहे. त्यामुळे होळीचा आनंद द्विगुणीत होणार आहे. दिल्लीतील तेल-तिळवण बाजारात शनिवारी जवळपास सर्वच तेलांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सूत्रांच्या माहितीनुसार, देशात गरजेपेक्षा जास्त खाद्य तेलाची आयात (Import of Edible Oil) झाली आहे. त्याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे. पण देशातील तेल उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे. मोहरी आणि सोयाबीन तेलाचे भाव उतरले आहेत. कपाशी तेलाच्या किंमतीही घसरल्या आहेत. तर कच्चे पामतेल (CPO) , पामोलीन तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किंमती पूर्वीच्याच दरावर बंद झाले.
बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, मलेशिया एक्सचेंजवरील व्यापार शु्क्रवारी बंद होता. त्यामुळे पाम आणि पामोलीन तेलाचा बाजारावर काय परिणाम झाला हे आता सोमवारी बाजार उघडल्यावर कळेल. बोली अधिक लावल्या जात असली तरी तेलाची विक्री अत्यंत कमी किंमतीवर होत आहे. शेंगदाणा तेलाचे दर मात्र चढेच आहेत. ड्रायफ्रुटच्या किंमती इतके शेंगदाणा तेल मिळत आहे. पण आयात तेलामुळे इतर तेल स्वस्त मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, देशात गरजेपेक्षा जास्त खाद्य तेलाची आयात झाली आहे. त्याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे. पण देशातील तेल उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे. देशातील बाजारात मोहरीची आवक शनिवारी वाढली. 8-8.25 लाख पोती मोहरी बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे मोहरी तेलाचा भाव कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य प्रदेशातील सागर येथील बाजारात गेल्यावर्षीच्या मोहरीचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटल आहे. किमान आधारभूत किंमतीपेक्षा 500 रुपयांनी त्यांची विक्री होत आहे. एमएसपी किंमत 5,000 रुपये प्रति क्विंटल आहे. जुन्या मोहरीतून कमी तेल उत्पादित होते. आयातीवर केंद्र सरकारने लवकर प्रतिबंध घातला नाही तर, मोहरीचे नवीन पिक हाती येऊन ही भाव किमान आधारभूत किंमतींपेक्षा कमी राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मोहरीची जी परिस्थिती आहे, तीच अवस्था कपाशी आणि सोयाबीन तेलाची होत आहे. यापूर्वी इतर राज्यांपेक्षा गुजरातमध्ये कपाशी तेलाची किंमत दोन ते तीन रुपये प्रति किलो अधिक होती. या तेलाची सर्वाधिक विक्री गुजरात राज्यात होत होती. पण आयात केलेल्या तेलाच्या दबावामुळे इतर राज्यातील कपाशी तेलाच्या किंमतीत जवळपास एक रुपयांची घसरण आली आहे.
शुल्क मुक्त आयात धोरणाचा देशातील तेल उत्पादन आणि तेलबियांच्या भावांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे देशी बाजारापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांकडील सोयाबीन, मोहरी, शेंगदाणे, कपाशी यांची योग्य भावाने, किमान आधारभूत किंमतींवर जर विक्री झाली नाही तर शेतकरी तेलबियांच्या उत्पादनाकडे पाठ फिरवतील आणि भविष्यात मोठे संकट उभे ठाकेल, अशी भीती व्यक्त होत आहे.