नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence-AI) सध्या जोरदार चर्चेत आहे. हॉलिवूडमधील लेखक आणि कलाकार त्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तर अनेकांना नोकऱ्या जाण्याचा धोका सतावत आहे. तर अनेक सरकारांना माहितीचा गैरवापर वाढण्याची भीती सतावत आहे. संगणक, कम्प्युटर आले तेव्हा पण अशीच धास्ती होती. भीती होती, पण त्याचा मोठा तोटा झाला नाही. तसाच एआयचा पण बाऊ करण्याची गरज नसल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. असो तर या एआयमुळे एक माणूस नवकोट नारायण झाला आहे. अचानकच त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याने ब्लूमबर्ग बिलेनिअरच्या निर्देशांकात (Bloomberg Billionaire Index) त्याने मोठी झेप घेतली आहे.
शेअर बाजारात तेजी
अमेरिकन शेअर बाजारात AI संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी दिसून आली. सोमवारी हे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहचले. याचा सर्वाधिक फायदा ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन (Larry Ellison) यांना झाला. त्यांनी श्रीमंतांच्या यादीत मोठी झेप घेतली. त्यांनी बिल गेट्स (Bill Gates) यांना मागे टाकले.
बिल गेट्स यांना टाकले मागे
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये गुरुवारी एलिसन जे जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहचले. त्यांची एकूण संपत्ती 5.92 अब्ज डॉलरने झपकन वाढली. त्यांची संपत्ती 135 अब्ज डॉलरवर पोहचली. तर बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 131 अब्ज डॉलर झाली. ते आता श्रीमंतांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर फेकले गेले.
इतकी वाढली संपत्ती
यावर्षी एलिसन यांची एकूण संपत्ती 43.5 अब्ज डॉलरने आणि बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 21.9 अब्ज डॉलरने वाढली. एलिसन 2014 मध्ये ओरॅकलच्या सीईओ पदावरुन बाजूला झाले. पण त्यांनी कंपनी सोडली नाही. त्यानंतर ते ओरॅकलचे चेअरमन आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर झाले. ओरॅकलमध्ये त्यांची हिस्सेदारी 42.9 टक्के इतकी आहे.
इतका मिळाला महसूल
यावर्षात ओरॅकलच्या शेअरमध्ये 42 टक्के तेजी दिसून आली. गेल्यावर्षी कंपनीने 50 अब्ज डॉलरचा महसूल जमावला. ओरॅकलला एआयमध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा झाला. या कंपनीने Open AI ची प्रतिस्पर्धी Cohere मध्ये गुंतवणूक केली आहे. एआयच्या शेअरने उंच उडी घेतल्याने एलिसनच्या नेटवर्थमध्ये रॉकेटच्या गतीने वाढ झाली.
मस्क बाबा पहिल्या क्रमांकावर
जगातील श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर आहे. त्यानंतर फ्रान्सचे बर्नार्ड आरनॉल्ट हे 196 अब्ज डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस 151 अब्ज डॉलर नेटवर्थसह तिसऱ्या स्थानावर आहेत.