दिल्ली : कन्याकुमारी पासून ते काश्मिर पर्यंत…. देशभरात एकाच दरात सोने विक्री होणार आहे. ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ योजनेमुळे(One Nation One Gold Rate Yojana) देशभरात सर्वत्र सोन्याचा दर एक सारखा राहणार आहे. देशात वन गोल्ड वन रेट योजना लागू करण्याची मागणी फार जुनी आहे. कन्यारुमारीपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत सोन्याच्या किमतीत तफावत होती. कारण ज्या बंदरातून सोने आयात करून उतरवले जाते, तेथून विविध राज्यांत पाठवले जाते. शिपिंग खर्च इत्यादी जोडल्यानंतर सोन्याची किंमत बदलते. मात्र, आयातीच्या वेळी सोन्याची किंमत तशीच राहते. किमतीतील तफावत दूर करण्यासाठी भारत सरकारने ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ योजना लागू केल्याचे समजते.
‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ योजनेमुळे देशभरात एकाच दरात सोने मिळणार आहे. सध्या तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सोन्याचा दर वेगवेगळा असतो. आयात केलेले सोनं देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यासाठी येणाऱ्या वाहतुक खर्चामुळे प्रत्येक राज्यात सोन्याचा भाव वेगळा वेगळा पहायला मिळतो.
बुलियन एक्स्चेंजमुळे हा बदल होणार आहे. बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकणार आहेत. यामुळे सराफांचा वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. त्यामुळेच सोन्याचा दर कमी ठेवण्यातही मदत मिळणार आहे.
पहिले भारतीय बुलियन एक्सचेंज गुजरातमध्ये आहे. भारतीय बुलियन एक्सचेंजचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे. बुलियन एक्सचेंजमुळे भारतात आयात केलेल्या सोन्याची खरेदी आणि विक्री प्रक्रिया सोपी होणार आहे. यामुळे देशासह जागतिक बाजारातही सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतीय बुलियन एक्सचेंजवर (आयआयबीएक्स) आतापर्यंत 64 सराफ व्यापारी जोडले गेले आहेत.
भारतीय बुलियन एक्सचेंज शेअर बाजाराप्रमाणे बाजार असेल. येथे सोन्याची खरेदी-विक्री होईल. बुलियन एक्सचेंजमधील बुलियनचा अर्थ बिस्किट किंवा नाण्यांच्या स्वरूपात असलेले उच्च गुणवत्तेची सोने किंवा चांदी आणि एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. त्यामुळे बुलियन एक्सचेंजचा अर्थ सोन्या-चांदीची देवाणघेवाण असा आहे. या आधी फक्त काही बँका किंवा केंद्रीय बँकांकडून मंजुरी मिळालेल्या संस्थांना देशात सोने किंवा चांदीची आयात करण्याची परवानगी होती. पण आता बुलियन एक्सचेंजवर ग्राहक सोने खरेदी करू शकतील. यामुळे सोन्याची आयात पारदर्शी होईल. बुलियन एक्स्चेंजमुळे सोन्याचे दर कमी करण्यात मदत होईल. याशिवाय देशभरात सोने आणि चांदीसाठी एकच दर लागू होईल.