क्रिप्टो जगात Binance हे मोठे अभासी चलन आहे. ही क्रिप्टो फर्म बाजारातील दादा आहे असे म्हटलं तर वावगे ठरु नये. बिनेंस या अभासी चलनाचा संस्थापक चांगपेंग झाओ आहे. पण त्याचे काही अतिरेकी निर्णय त्याला चांगलेच भोवले. त्याचे चलन हे दहशतवाद्यांसाठी जणू कुरुनच झाले होते. Binance हे Terror Funding साठी वापरण्यात येत होते. विशेष म्हणजे या पठ्याने सायबर गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना स्वतंत्रपणे व्यवहार करता यावा यासाठी खास व्यवस्था करुन दिली होती. आता त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहे.
वकिलांची फौज घेऊन न्यायालयात
या सर्व प्रकरणात बिनेंसचा संस्थापक चांगपेंग झाओ याची सक्रियता दिसून आली होती. टेरर फंडिंगप्रकरणात 47 वर्षीय झाओला मंगळवारी सिएटल येथील अमेरिकन जिल्हा न्यायाधीश रिचर्ड जोन्स यांनी शिक्षा सुनावली. फिक्कट निळ्या रंगाच्या टायसह गडद रंगाचा सूट घालून हा अब्जाधीश वकिलांच्या अर्ध्या डझन फौजेसह न्यायालयात पोहचला होता. त्याची आई आणि बहिण सुद्धा न्यायालय कक्षात पहिल्या रांगेत बसल्या होत्या. अभियोग पक्षाने त्याला तीन वर्षांची शिक्षेपेक्षा अधिकची शिक्षा सुनावण्याची विनंती केली होती. त्यासंबंधीचा दीर्घ युक्तीवाद करण्यात आला. तसे त्याचे कृत्य पाहता सर्वांसमोर एक धडा म्हणून अधिक शिक्षेचा युक्तीवाद करण्यात आला.
कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही
न्यायाधीश रिचर्ड जोन्स यांनी निकालपत्रात मार्मिक टिप्पणी केली. धन, शक्ती आणि मोठ्या हुद्दावर असल्याने कोणी व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा होत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. झाओने या शिक्षेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याला तुरुंगाधिकाऱ्यांकडे सोपविण्याची तारीख निश्चित करण्यात आली नाही. चांगपेंग झाओ, सिएटलमधील फेडरल डिटेंशन सेंटर, सीटॅकमध्ये त्याची शिक्षा पूर्ण करेल. त्यानंतर कदाचित त्याच्या कुटुंबासह संयुक्त अरब अमिरातीतील त्याच्या मूळ कुटुंबाकडे जाण्याची शक्यता आहे.
चार महिन्यांचा तुरुंगवास
न्यायाधीश जोन्स यांनी हा गु्न्हा मोठा असल्याचे स्पष्ट केले. कारण यामध्ये हॅकर्स आणि दहशतवाद्यांनी लाखो डॉलरचा व्यवहार केलेला आहे. त्याला बिनेंसने परवानगी दिली. सुनावणीअंती चांगपेंग झाओ याला न्यायालयाने चार महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली.