नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : आता पावसाचा आनंद द्विगुणित होणार आहे. भज्जी, समोसा, कचोरी तळून खाता येईल. खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. वर्षभरात किंमती निच्चांकावर पोहचल्या आहेत. सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने संसदेत या बदलाची माहिती दिली. रिफाईंड सनफ्लॉवर तेल, रिफाईंड सोयाबीन, आणि रिफाईंड पॉमोलीन तेलाच्या किंमतीत एका वर्षात मोठी घसरण झाली. त्यामुळे शुद्ध सूर्यफुल तेलामध्ये 29 टक्के, शुद्ध सोयाबीन तेलाच्या किंमतीत 19 टक्के आणि पॉमोलीन तेलाच्या भावात 25 टक्क्यांची घसरण झाली. खाद्यतेल स्वस्त झाल्याने या महागाईत जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. किचनचे बजेट अधिक कोलमडले नाही. स्वस्त खाद्यतेलामुळे (Edible Oil Prices) महागाईची आकडेवारी आटोक्यात आहे.
खाद्यतेलाची स्वस्ताई कशामुळे
केंद्र सरकारने लोकसभेत खाद्यतेलाच्या स्वस्ताईविषयी लिखित निवेदन दिले. केंद्र सरकारने तेलाचे भाव नियंत्रीत ठेवण्यासाठी पाऊलं टाकल्याचं सांगण्यात आले. ग्राहक खात्याचे राज्यमंत्री निरंजन ज्योती यांनी निवेदन दिले. केंद्र सरकार गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचा दावा करण्यात आला. जागतिक बाजारात पण खाद्य तेलाच्या किंमती उतरणीला आहेत.
आयात शुल्कात कपात
भारत रिफाईंड तेलाच्या ऐवजी कच्चे सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात करतो. तरीही केंद्र सरकारने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे. या कपातीमुळे रिफाईंड खाद्यतेलावरील शुल्क कमी होऊन 13.7 टक्के झाले आहे. यामध्ये सामाजिक कल्याण सेसचा सहभाग आहे. आता मुख्य खाद्यतेलावरील शुल्क 5.5 टक्के आहे.
आयातीवर अवलंबून
भारत खाद्यतेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. आयातीच्या माध्यमातून भारत 60 टक्के मागणी पूर्ण करतो. देशात तेलबिया उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असले तरी त्यातून अद्याप काही साध्य झालेले नाही. काही वर्षात मात्र फरक दिसू शकतो.
भेसळीपासून राहा सावध
पण त्यासोबतच मोहरीच्या आणि पामतेलातील भेसळीच्या बातम्यांनी चिंताही वाढवली आहे. काही प्रमुख खाद्यतेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्यांनी गेल्या आठवड्याभरात सर्वांचीच चिंता वाढवली आहे. त्यामुळे खाद्यतेल खरेदी करताना त्याची खात्री करुन घ्या. तेलाच्या किंमती स्वस्त होत असताना काही व्यापारी भेसळ करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी भेसळयुक्त खाद्यतेलाची तक्रार करणे गरजेचे आहे.
इतकी झाली घसरण
रिफाईंड सनफ्लॉवर तेल, रिफाईंड सोयाबीन, आणि रिफाईंड पॉमोलीन तेलाच्या किंमतीत एका वर्षात मोठी घसरण झाली. त्यामुळे शुद्ध सूर्यफुल तेलामध्ये 29 टक्के, शुद्ध सोयाबीन तेलाच्या किंमतीत 19 टक्के आणि पॉमोलीन तेलाच्या भावात 25 टक्क्यांची घसरण झाली. खाद्यतेल स्वस्त झाल्याने या महागाईत जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.