नवी दिल्ली : सोने-चांदीने (Gold Silver Price) पुन्हा एकदा खरेदीदारांची बोबडी वळवली आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंनी रेकॉर्ड तोडण्याचा सपाटाच लावला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा दोन पाऊल पुढं त्यांची घौडदौड सुरु आहे. सोने आणि चांदीच्या किंमती एकदम झपाट्याने वाढत आहे. ‘दिन दुगनी, रात चौगुनी’, अशी भावाची प्रगती आहे. या सूसाट किंमतींमुळे खरेदीदार बाजाराकडे जाण्यास धजावत नसल्याचे समोर आले आहे. आज सकाळी भावातील तेजीला थोडा ब्रेक लागला होता. पण संध्याकाळ होताच सोने-चांदीच्या किंमतीनी पुन्हा उसळी घेतली. त्यामुळे आता सोने 65,000 तर चांदी 82,000 होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
62,000 ची सलामी
सोने-चांदीने 5 एप्रिल रोजी रेकॉर्ड केला होता. या दिवशी या दोन्ही धातूंनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,400 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,510 रुपये होती. गुडरिटर्न्सनुसार, शुक्रवारी, 14 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 550 रुपयांची वाढ झाली. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 600 रुपयांनी वधारला. त्यामुळे अगोदरच चढाईवर असलेल्या सोन्याने नवीन रेकॉर्ड केला. संध्याकाळी 22 कॅरेट सोने प्रति तोळा 56,800 रुपयांवर पोहचले तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,950 रुपये झाली.
चांदी 80,000 घरात
चांदीने गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी केली आहे. गुंतवणूकदारांना सोन्यापेक्षा चांदीतून जास्त परतावा मिळाला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात चांदीने 12 टक्क्यांचा परतावा दिला आहे. सकाळी 78,000 रुपयांच्या घरात असलेल्या चांदीने संध्याकाळपर्यंत मोठी झेप घेतली. चांदीच्या किंमतीत 1600 रुपयांची वाढ होऊन एक किलो चांदीचा भाव 79,600 रुपये झाला.
चार शहरातील भाव
गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,650 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,800 रुपये होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,800 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,800 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,680 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,830 रुपये आहे.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
शुद्ध सोन्याचा हॉलमार्क
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.