नवी दिल्ली : टाटा समूहाची (Tata Group Stocks) उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. कंपनीने सेबीकडे DRHP फाईल केले आहे. त्याला आता दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओसंबंधी माहिती शेअर बाजारात पोहचताच, गुंतवणूकदार उत्साहीत झाले. बाजाराने आयपीओ येण्यापूर्वीच त्याच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये (Tata Motors Share) सध्या जोरदार तेजी दिसून येत आहे. कंपनी जवळपास दर दिवशी तिच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा किती तरी पुढे निघाली आहे. टाटा मोटर्सचे मार्च महिन्यातील तिमाही निकाल पण अपेक्षेपेक्षा जोरदार आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी टाटाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
टाटा मोटर्सचे तिमाही निकाल
टाटा मोटर्सने गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत 5408 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमाविला आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 2021-22 मधील चौथ्या तिमाहीत कंपनीने 1033 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. टाटा मोटर्सची चौथ्या तिमाहीतील महसूलात वाढ होऊन 1,05,932 कोटी रुपये होईल. जानेवारी-मार्च 2022 मध्ये हा महसूल 78,439 कोटी रुपये होता.
आयपीओ बाजारात प्रतिक्षा
टाटा मोटर्सची टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये एकूण होल्डिंग 74.69 टक्के आहे. कंपनी येत्या काही काळात आयपीओच्या माध्यमातून तिचे 9571 कोटी शेअरची विक्री करेल. 9 मार्च 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजीजने सेबीकडे आयपीओसाठी पैसे जमा केले होते.
टाटा मोटर्सचे टार्गेट प्राईस
जोरदार तिमाही निकालामुळे एक्सपर्ट टाटा मोटर्सविषयी अधिक आशावादी झाले आहेत. अनेक तज्ज्ञांनी हा शेअर 590 रुपयांपर्यंत झेप घेईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारी कंपनी्या शेअरमध्ये 0.43 टक्के तेजी दिसून आली. हा शेअर 513.80 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्सचा शेअर 9 टक्क्यांनी वधारला आहे.
कंपनी होईल कर्जमुक्त
टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे (Tata Motors Share) तिमाही निकाल लवकरच हाती येणार आहे. यावेळी कंपनी जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते. टाटा कंपनीवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. हा शेअर काही दिवसातच लांबचा पल्ला गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा होईल.
हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.