नवी दिल्ली : सोन्यातील फसवणुकीपासून ग्राहकांचे हितरक्षणासाठी केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Gold Hallmarking) अनिवार्य केले आहे. तरीही सोन्यात भेसळ होतेच आणि अशा दागिन्यांची विक्री करण्यात येते. हॉलमार्किंग फेडरेशन ऑफ इंडियाने (HFI) पण याविषयीची शक्यता नाकारली नाही. काही दुकानदार इतर धातुंचे मिश्रण करुन हॉलमार्किंगच्या (Fake Gold Hallmark) आधारे सोन्याची दागिने विक्री करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. फेडरेशनने केंद्र सरकारला याविषयीचे पत्र लिहिले आहे. तसेच अशा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
HFI चे अध्य७ जेम्स जोस यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने हॉलमार्किंगच्या जुन्या लोगोवर अद्यापही बंदी घातलेली नाही. त्याच्या आडून नकली हॉलमार्किंग जोरात सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे कमी कॅरेटचे सोने जास्त कॅरेटचे असल्याचा बनाव करुन ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे.
जोस यांच्या दाव्यानुसार, हॉलमार्किंगचा जुना लोगो हा विश्वसनीय नाही. तो लोकांची फसवणूक रोखू शकत नाही. हा लोगो जास्त सुरक्षित नाही. नकली हॉलमार्किंग रोखण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या लोगोच्या वापरावर बंदी घालणेच हितवाह असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हॉलमार्किंग हे सोन्याची शुद्धतेची हमी देते. प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क चिन्हांकित असतो. त्यामध्ये भारतीय मानक ब्यूरोचा (BIS) लोगो, त्याची शुद्धता याची माहिती अंकित असते. यासोबतच या सोन्याची शुद्धता तपासणी केंद्र आणि इतर माहिती चिन्हांकित असते.
प्रत्येक दागिन्यात सोन्याची मात्रा वेगवेगळी असते. दागिन्याची शुद्धता कॅरेट आधारे निश्चित करण्यात येते. अनेकदा ज्वेलर्स कमी कॅरेटचे दागिने, अधिक कॅरेटची असल्याचा बनाव करुन ग्राहकांची लूट करतात. त्यांची फसवणूक करतात.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 1 जुलै रोजी हॉलमार्किंगच्या नियमात बदल केला होता. हॉलमार्किंगच्या चिन्हांमध्ये बदल केला होता. चिन्हांची संख्या तीन केली होती. पहिले चिन्ह बीआयएस हॉलमार्कचे आहे. हे त्रिकोणी चिन्ह आहे. दुसरे चिन्ह सोन्याच्या शुद्धतेचे आहे. त्यामुळे सोने किती कॅरेटचे आहे, याची माहिती मिळते.
तिसरे चिन्ह हे अल्फान्यूमेरिक कोड असते. हे संख्या आणि अक्षरांचं मिळून तयार झालेलं चिन्हं असते. त्याला HUID चिन्ह म्हणतात. या कोडमध्ये अक्षर आणि संख्येचा समावेश असतो. हॉलमार्किंगच्यावेळी ज्वेलर्सला हा क्रमांक देण्यात येतो. हा क्रमांक युनिक असतो.