नवी दिल्ली : देशातील मोठ्या उद्योजक घराण्यातील मुलंच नाही तर मुलींनी (Businessman Daughters) पण त्यांचा दमखम दाखविला आहे. त्यांनी कमान हाती घेताच व्यवसायाची भरभराट झाली आहे. भारतात अनेक मोठी उद्योजक घराणी आहेत. उद्योजकांच्या मुलींनी परंपरागत सोबतच नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोऊन भरभराट केली आहे. या नवीन व्यवसायाचा देशभरात विस्तार झाला. वडिलांच्या व्यवसायाला चार चाँद लावण्याचे काम या राजकुमारींनी केले आहे. अवघ्या काही वर्षात या नवीन व्यवसायाने बाळसेच धरले नाही तर कोट्यवधींची उलाढाल (Turnover) पण केली आहे.
ईशा अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी, रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाला पुढे नेत आहे. ईशा अंबानी मुकेश आणि नीता अंबानी यांची लाडकी मुलगी आहे. अवघ्या 23 व्या वर्षी तिने रिलायन्सचा कारभारात लक्ष घातले. वडिलांना व्यवसायात मदत केली. ईशा अंबानी हिने एप्रिल 2016 साली AJIO ची सुरुवात केली. ही कंपनी रिलायन्स समूहाचा मल्टी ब्रँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. पाश्चिमात्य आणि देशातील कपड्यांचे हे मोठे ऑनलाईन स्टोअर आहे.
जयंती चौहान
गेल्या काही दिवसांपासून जयंती आणि बिसलेरी हे दोन्ही चर्चेत आहेत. बिसलेरीचे अधिग्रहण फसल्यापासून जयंती बिसलेरीचा कारभार पाहिल असे बोलल्या जात होते. पण मध्यंतरी पुन्हा या व्यवसायात जयंतीचे लक्ष लागत नसल्याचे समोर आले. 24 वर्षाची असतानाच जयंतीने वडिलांच्या बिसलेरी व्यवसायात लक्ष घातले. रमेश चौहान यांची 42 वर्षांची मुलगी जयंती चौहान (Jayanti Chauhan) कंपनीचा कारभार हाती घेणार असल्याचा दावा करण्यात आला. जयंतीने या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. अनेक नवीन कल्पनांवर तिने काम सुरु केले. आयपीएलमध्ये दोन टीमसोबत करार झाला. डोअर-टू-डोअर डिलिव्हरीवर भर देण्यात आला.
लक्ष्मी वेणू
ऑटो कंपनी टीव्हीएस मोटरचे चेअरमन यांची मुलगी डॉ. लक्ष्मी वेणू या वडिलांचा व्यवसाय पुढे नेत आहेत. त्या टीव्हीएसची उपकंपनी सुदरम क्लेटन लिमिटेडची (SCL) व्यवस्थापकीय संचालक आहे. लक्ष्मी वेणू दहा वर्षांपासून या कंपनीची जबाबदारी संभाळत आहेत. ही कंपनी जागतिक स्तरावर पोहचवण्यात त्यांचा मोठा हातभार लागला आहे.
फाल्गुनी नायर
फाल्गुनी नायर यांची 31 वर्षीय मुलगी अद्वैता नायर फॅशन रिटेल ब्रँड, नायकाची सहसंस्थापक आणि सीईओ आहे. त्यांनी येल विद्यापीठातून पदवी तर हॉर्वर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. आता त्यांच्याकडे नायकाची जबाबदारी आहे. आज नायकाचे 400 ब्रँड बाजारात आहेत. 40 शहरात 20 वेअरहाऊस आणि 80 स्टोर आहेत.
अश्नी बियाणी
फ्यूचर ग्रुपचे संस्थापक किशोर बियाणी यांची मुलगी अश्नी बियाणी यांनी पार्सन्स स्कूल ऑफ डिझाईन आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून डिझाईनिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले. तर स्वतःचा Voom हा ब्रँड लाँच केला. फ्यूचर ग्रुप सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. रिलायन्स समूहासह 49 कंपन्यांनी फ्यूचर ग्रुप खरेदीसाठी तयारी केली आहे.