नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफच्या व्याजदरात 0.10 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. यामुळे 2018-19 या आर्थिक वर्षातील पीएफवरील व्याजदर 8.55 टक्क्यांवरून 8.65 टक्के झाला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला अर्थमंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे सर्व नोकरदार वर्गाला यंदाच्या वर्षीपासून पीएफच्या रक्कमेवर वाढीव व्याज मिळणार आहे.
पीएफच्या व्याज दरात चालू आर्थिक वर्षात वाढ करण्यात यावी याबाबत नुकतेच ईपीएफओ आणि इतर विभागातंर्गत बैठक आयोजित केली होती. यावेळी पीएफमध्ये वाढ करण्याच्या निर्णयावर सर्व अधिकाऱ्यांचे एकमत झाले. यानुसार अर्थ मंत्रालयातंर्गत येणाऱ्या आर्थिक सेवा विभागातील 2018-19 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओच्या सदस्यांना 8.65 टक्के व्याजदरास परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या 3 वर्षात पीएफच्या व्याजदरात प्रथमच वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा 6 कोटी नोकरदारांना होणार आहे.
दरम्यान, या बैठकीत किमान पेन्शनच्या रकमेत दुपटीने वाढ करुन ती 2 हजार करण्याच्या प्रस्तावावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. मे महिन्यात होणाऱ्या बैठकीत पेन्शनच्या रक्कमेबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच किमान पेन्शनची रक्कम दुप्पट केल्यास 3000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करावी लागेल. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या परवानगीनंतरच या निर्णयावर अंमलबजावणी केली जाईल.
गेल्या 5 वर्षातील पीएफ दर
2013-14 आणि 2014-15 या दोन्ही आर्थिक वर्षात पीएफवर 8.75 टक्के व्याजदर देण्यात येत होता. त्यानंतर 2015-16 या आर्थिक वर्षात पीएफमध्ये कपात करत 8.8 टक्के व्याजदर देण्यात आला. त्यानंतर 2016-17 या वर्षात पीएफच्या व्याजदरात वाढ करत तो 8.65 टक्के केला गेला आणि गेल्यावर्षी म्हणजेच 2017-18 या वर्षात पीएफच्या रक्कमेवर 8.55 टक्के व्याज देण्यात आला.