नवी दिल्ली : बँक कर्मचारी आणि ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. ग्राहकांना आता शनिवारी बँकेची पायरी चढण्याची गरज नाही. शनिवार-रविवार बँका बंद (Bank Closed) राहण्याची शक्यता आहे. लवकरच बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा (Five Days Week) जाहीर होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना आता दुसरा-तिसरा शनिवारच्या चक्करमध्ये अडकण्याची गरज भासणार नाही. इंडियन बँक असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉयीज यांच्यामध्ये याविषयीचे एकमत घडून आले आहे. शनिवारच्या कामकाज पाच दिवसांत भरुन काढण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना बँकेत जास्तवेळ थांबावे लागेल. त्यांच्या दैनंदिन वेळेत वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना दररोज 40 मिनिटं अतिरिक्त काम करावे लागेल. सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. बऱ्याचदा ग्राहक या दिवशीही बँकेकडे जातो. त्यामुळे त्याची नाहक चक्कर होते. आता ही चक्कर थांबणार आहे.
बँक कर्मचारी आणि त्यांच्या संघटना अनेक दिवसांपासून पाच दिवसांच्या आठवड्यांची मागणी करत होते. शनिवार-रविवार सुट्टीचा वार करण्याची त्यांची मागणी होती. गेल्या वर्षी एलआयसीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक क्षेत्रात पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी जोर धरु लागली आहे.
इंग्लंडमधील अनेक कंपन्यांनी चार दिवसांच्या आठवड्यांचा प्रयोग राबविला आहे. या कंपन्यांमध्ये कर्मचारी केवळ 4 दिवस काम 3 दिवस आराम करतात. या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस सुट्टी मिळत आहे. इंग्लंडमध्ये या प्रयोगाची सुरुवात गेल्या जून महिन्यात करण्यात आली होती. या प्रयोगात जवळ जवळ 61 कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्सचे जनरल सेक्रेटरी एस. नागराजन यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, निगोशिएबल इन्स्ट्रमेंट्स अॅक्टअंतर्गत केंद्र सरकारला याविषयीची अधिसूचना काढावी लागेल. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. गेल्या अनेक दिवसांपासून फाईव्ह डे वीक ची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून याविषयीच्या निर्णयाला मंजुरी घ्यावी लागणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयबीएने या प्रस्तावाबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
याविषयी आयबीएच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क होऊ शकला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना रोज 40 मिनिटं अधिक काम करावे लागेल. निर्णय झाल्यास बँका सकाळी 9.45 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत उघड्या राहतील . कर्मचारी संघटनांच्या मते, आता मोठ्या प्रमाणात खातेदार मोबाईल बँकिंग, एटीएम आणि इंटरनेट बँकिंग सुविधांचा वापर करतात. तर काही ग्राहक अद्याप ही कामकाजासाठी बँकेत जातात. बँकेत आणि शाखेतही कॅश डिपॉझिट आणि पासबूक मशीन बसविण्यात आल्या आहेत.
स्टॉक मार्केटमध्ये पण ट्रेडिंगच्या वेळेत बदल करण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. शेअर बाजारात व्यापारी सत्रात वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ट्रेडिंग वेळ (Trading Timing) आता 3:30 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. शेअर बाजाराची व्यापार करण्याची वेळ वाढविण्यासंबंधीची रुपरेखा बाजार नियामक सेबीने (SEBI) 2018 साली तयार केली होती.