नवी दिल्ली | 29 नोव्हेंबर 2023 : अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गने अदानी समूहाला मोठा फटका दिला. या संबंधीच्या अपडेटकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारच नाही, तर सर्वांचेच लक्ष असते. आता देशातच नाही तर परदेशात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. हे वर्ष अदानी समूहासाठी सर्वात घातक ठरले. त्यांचावर चोहोबाजूंनी हल्ला चढविला गेले. अनियमिततेचे आरोप झाले. प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. या संकट काळात गौतम अदानी यांना अमेरिकेतील त्यांचे मित्र राजीव जैन आणि GQG Partners यांनी मदत केली. त्यांनी समूहात मोठी गुंतवणूक केली. त्याची परतफेड सातत्याने होत आहे.
एका झटक्यात 3 हजार कोटींचा फायदा
अदानी समूहात पडझड सुरु असताना राजीव जैन यांनी मोठी गुंतवणूक केली. बाजारातील सर्वसामान्य गुंतवणूकदार पुन्हा अदानी समूहाकडे वळला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे अपडेट बाहेर आले. त्यानंतर अदानी समूहातील शेअर्सच्या किंमतीत मोठी उसळी दिसली. अनेक कंपन्यांचे शेअर 4 ते 20 टक्क्यांनी वधारले. राजीव जैन यांच्या जीक्यूजी फर्मला एका झटक्यात
3 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला.
या कंपन्यात गुंतवणूक
कॉर्पोरेट डाटाबेस यस इक्विटीच्या आकडेवारीनुसार, अदानी समूहातील 10 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 6 मध्ये राजीव जैन यांच्या फर्मची मोठी गुंतवणूक आहे. यामध्ये अदानी पॉवर लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड, अदानी इंटरप्राईजेज लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी पोर्टस अँड एसईझेड, अंबूजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी जीक्यूजीचे या समूहातील गुंतवणुकीचे मूल्य 27,998.08 कोटी रुपये होते. ते वाढून आता 31,000 कोटी रुपये झाले आहे.
बाजारातील भांडवल 11 लाख कोटी
अदानी समूहाचे बाजारातील एकूण भांडवल 11 लाख कोटींच्या पुढे गेले. यावर्षी 24 जानेवारी रोजी ते 19.19 लाख कोटी रुपये होते. त्याच दिवशी हिंडनबर्गचा अहवाल जगजाहीर झाला होता. सध्या हे मार्केट कॅप 40 टक्के कमी आहे . हिंडनबर्गच्या आरोपांच्या फैरीनंतर कंपनीचे मार्केट कॅप 150 अब्ज डॉलरने घसरले होते. सर्वोच्च न्यायालयाने सेबीला या आरोपांचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाने प्रकरणात निखाल राखून ठेवला आहे.
काय म्हणाले सुप्रीम कोर्ट
केवळ मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेऊन सेबीच्या तपासावर शंका उपस्थित करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने निरिक्षण नोंदवले. सेबीला 24 प्रकरणांचा तपास पूर्ण करावा लागेल. यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी सेबीने न्यायालयात अहवाल दाखल केला होता. त्यानुसार, 24 मधील 22 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे.