नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्राईजसची चौकशी करण्यात येत आहे. गौतम अदानी यांच्यावर संकटांची मालिका सुरु आहे. आरोपांची राळ त्यांच्यावर उठली आहे. त्याचा या समूहाला मोठा फटका बसला आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत प्रथम क्रमांकाला गवसणी घालता घालता गौतम अदानी जे घसरले. ते पुन्हा या यादीत पिछाडीवरच आहेत. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गने अदानी समूहाच्या व्यवहारावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून अदानी समूह अस्थिर झाला आहे. आता केंद्र सरकारच्या कंपनीविषयक मंत्रालयाने आरोपांची शहानिशा करण्यासाठी चौकशी सुरु केली आहे.
काय आहे प्रकरण
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी मुंबईत डेरे दाखल झाले आहेत. शुक्रवारी अदानी एंटरप्राईजेसने याविषयीची माहिती दिली. मुंबईतील दोन विमानतळांची देखभाल आणि व्यवस्थापनासाठी अदानी एंटरप्राईजेसने चालवायला घेतले आहे. ही प्रक्रिया आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पूर्ण झाली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील अंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन पाहण्यासाठी हे अधिग्रहण करण्यात आले होते. मंत्रालयाने 2017-2022 या काळातील महत्वाची माहिती आणि कागदपत्रे मागितली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यास अदानी समूहाने नकार दिला.
काय आहे आरोप
हिंडनबर्ग आणि आणखी एका अमेरिकन शॉर्ट सेलरने अदानी समूहाने कर चोरी, शेअरमध्ये गडबड केल्याचा आरोप केला होता. कुटुंबातील काही सदस्यांच्या परदेशातील संस्थांच्या माध्यमातून घोटाळ्याचा आरोप केला होता. यामध्ये मलेशिया, इंग्लंड येथील फर्मचा उल्लेख करण्यात आला होता.
चौकशीचा ससेमिरा
भारतीय कॉर्पोरेट मंत्रालयाने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अदानी समूहाच्या व्यवहाराच्या चौकशीला सुरुवात केली होती. भारताची बाजार नियामक संस्था सेबीने, अदानी समूहामधील परदेशातील गुंतवणुकीबाबत संशयास्पद उल्लंघनाविषयी चौकशी केली. त्यातील रकाना कोरा असल्याचे न्यायालयाने नियुक्त केलेल्या पॅनलने मे महिन्यात टिप्पणी केली होती.
काय होता आरोप
काही महिन्यांपूर्वी ईडीने याप्रकरणात प्राथमिक तपास पूर्ण केला. त्यात शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून काही जणांना मोठा फायदा झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. जगातील दिग्गज गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या ऑर्गेनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) काही महिन्यांपूर्वी अदानी समूहावर गंभीर आरोप लावले आहेत. फर्मच्या दाव्यानुसार, अदानी कुटुंबियांच्या भागीदारांनी शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी ‘ऑफ शोर’ म्हणजे Opaque फंडचा वापर केला.