मुंबई | 8 जानेवारी 2024 : अब्जाधीश गौतम अदानी यांची साल 2024 ची सुरुवातच जोरदार झाली आहे. जगातील टॉप अब्जोपतींच्या यादीत गौतम अदानी यांचा क्रम वाढतच चालला आहे. अदानी यांनी त्यांचा व्यवसायाचा विस्तार सुरुच ठेवला आहे. आता त्यांनी एक मोठी बिझनेस डील केली आहे. साल 2024 ची ही त्यांची पहीलीच डील असून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा मोठा व्यवहार केला आहे. अदानी ग्रुपची सिमेंट सेक्टर मधील दिग्गज कंपनी एसीसी लिमिटेडने आता एसीसीपीएल नावाच्या कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केल्याने ही कंपनी त्यांच्या नावे जमा झाली आहे.
अदानी ग्रुपच्या एसीसी लिमिटेडने सोमवार 8 जानेवारी रोजी एशियन कॉंक्रीट्स एण्ड सिमेट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अधिग्रहण पूर्ण केल्याचे बिझनेस स्टॅंडर्डच्या बातमीत म्हटले आहे. 775 कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सिमेंट सेक्टरमध्ये अदानी यांचा दबदबा वाढला आहे. नवीन वर्षांच्या या पहिल्याच करारामुळे अदानी ग्रुपच्या शेअरवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे एसीसी लि.चे शेअर 2350 रुपयांवर ट्रेंड करीत आहेत.
एसीसी लिमिटेड अदानी ग्रुपची सिमेंट फर्म अंबूजा सिमेंटची सब्सिडियरी कंपनी आहे. या कंपनीकडे एशियन कॉंक्रीट एण्ड सिमेंट्समध्ये 45 टक्के हिस्सेदारी आहे. त्यातच कंपनीने हीच्या सध्या प्रोमोटर्सकडून बाकीचे 55 टक्के वाटाही खरेदी केला आहे. आता ACCPL ची संपूर्ण मालकी एसीसी जवळ आली आहे. या 55 टक्के शेअरचे अधिग्रहणाची किंमत 425.96 कोटी आहे.
एकीकडे गौतम अदानी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी नवीनवीन करार करीत आहेत. तशी त्यांची एकूण संपत्ती देखील रोज वाढत आहे. ब्लुमबर्ग बिल्येनियर्स इंडेक्सच्या मते गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 94.5 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते 14 व्या क्रमांकावर आहेत. साल 2024 च्या सुरुवातीला त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ दिसत आहे. अन्य अब्जाधीशांना मोग टाकत या वर्षी त्यांनी 10.2 अब्ज डॉलरची कमाई केली आहे.