नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : देशातील पॉप्युलर कंझ्युमर ब्रँडमधील एक फॉर्च्युनची (Fortune Brand) मालकी अदानी विल्मर लिमिटेडकडे आहे. आता या समूहातून गौतम अदानींचे नाव बाजूला होऊ शकते. काही चर्चांनुसार अदानी समूह फारकत घेण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह अदानी विल्मरमधील (Adani Wilmar) त्यांचा वाटा विकण्याच्या तयारीत आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टचा फटका बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे अदानी समूह आता संपूर्ण लक्ष अदानी समूहावर केंद्रीत करण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह त्यांच्या पोर्ट, एनर्जी आणि ट्रेडिंग या व्यवसायावर लक्ष केंद्रीत करु शकतो. अदानी विल्मरच्या फॉर्च्युन ब्रँडची गणना देशातील निवड एफएमसीजी (FMCG) ब्रँडमध्ये करण्यात येते.
इतके टक्के वाटा
अदानी विल्मर लिमिटेडमध्ये गौतम अदानी यांची अदानी इंटरप्राईजेस आणि सिंगापूर येथील विल्मर इंटरनॅशनल लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. गेल्या वर्षी कंपनी शेअर बाजारात त्यांचा आयपीओ घेऊन आली होती. कंपनीने बाजारातून 36 अब्ज डॉलर जमवले आहे. आयपीओ आल्यानंतर कंपनीत दोन्ही समूहाची 44-44 टक्के इतकी हिस्सेदारी उरली आहे. त्यापूर्वी हा वाटा 50-50 टक्के होता.
कर्ज चुकविण्यासाठी 22,370 कोटींचा फायदा
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, शेअर बाजारातील सध्याच्या भावानुसार, अदानी विल्मरमध्ये अदानी समूहाची हिस्सेदारी 2.7 अब्ज डॉलर (जवळपास 51,370 कोटी रुपये) इतकी आहे. याविषयी काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूह त्यांचा वाटा विकून इतर समूहात ही रक्कम लावू शकतो. कर्जाचा बोझा चुकता करु शकतो. कर्ज चुकविण्यासाठी यातील 22,370 कोटींचा फायदा होऊ शकतो.
2 लाख कोटींचे कर्ज
हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनुसार अदानी समूहावर 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. वाटा विक्रीचा निर्णय झाल्यास 22,370 कोटी रुपये कर्ज चुकविण्यासाठी उपयोगात येतील. सेबीच्या नियमानुसार, कोणत्याही सूचीबद्ध कंपनीला 5 वर्षांच्या आता त्यांची 25 टक्के हिस्सेदारी पब्लिक शेअरहोल्डिंगमध्ये बदलावी लागते.
खासगी वाटा सुरक्षित
अदानी कुटुंबिय अदानी विल्मरमधील त्यांचा काही खासगी वाटा विक्री करणार नाहीत, असेही वृत्त समोर येत आहे. याविषयी अदानी समूह आणि विल्मर इंटरनॅशनल या दोघांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. बाजारातील अंदाजावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास दोन्ही बाजूने नकार देण्यात आला आहे.
शेअर बाजारात घमासान
अदानी विल्मरमधून अदानी समूह बाहेर पडण्याचे वृत्त शेअर बाजारावर परिणाम करु शकते. हे वृत्त खरं ठरल्यास कंपनीच्या शेअरमध्ये घसरण येऊ शकते. शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री होण्याची शक्यता आहे. एकाच वर्षात 2023 च्या 7 महिन्यात अदानी विल्मरच्या शेअरच्या भावात 36 टक्के घसरण झाली आहे. कंपनीचे भांडवल घसरुन 6.2 अब्ज डॉलर ( जवळपास 51,370 कोटी रुपये) वर घसरले आहे.