लोकसभा निवडणूक 2024 च्या सात टप्प्यातील मतदान आज, 1 जून रोजी होत आहे. त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दमदार कामगिरीने भारतीयांना सुखद धक्का दिला. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी येईल. त्यापूर्वी ही आनंदवार्ता येऊन धडकली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी- मार्च 2024 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनात,GDP मध्ये अर्थव्यवस्थाने मोठी उडी घेतली. जीडीपी वाढ 7.8 टक्के राहिली. या दमदार कामगिरीने भारताने चीनची झोप उडवली आहे. चीनपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड चांगली झाल्याचे दिसून येते. पण अजून चीन इतकी अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला मोठी मेहनत करावी लागणार हे पण तितकेच खरे.
चीनपेक्षा दुप्पट कामगिरी
यंदाच्या आर्थिक वर्षात, जानेवारी- मार्च 2024 या तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्के राहिली. गेल्या वर्षी या समान कालावधीतील तिमाहीत जीडीपी वाढ 6.1 टक्के इतकी होती. तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जीडीपी वाढ 8.2 टक्के इतकी होती. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये चीनचा जीडीपी जवळपास 4.5 टक्क्यांचा जवळपास होता. चीनचा आर्थिक वृद्धी दर जानेवारी ते मार्च या तिमाहीत 5.3 टक्के इतका आहे.
गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहीचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्था जून तिमाहीत 8.2 टक्के, सप्टेंबर तिमाहीत 8.1 टक्के आणि डिसेंबर तिमाहीत 8.4 टक्क्यांच्या दराने वाढली. चौथ्या तिमाहीत हा आकडा
7.8 टक्के इतका होता.
RBI चा अंदाज 6.9 टक्क्यांपेक्षा अधिक
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीचा वृद्धी दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अंदाजाच्या 6.9 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेला ग्रहण
कोरोना काळानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. अनेक कंपन्यांनी चीनमधून बस्तान हलविले आहे. चीनचा जीडीपी वृद्धीसाठी झुंजत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2024 साठी चीनची जीडीपी वृद्धी दराचा अंदाज 4.6 टक्क्यांहून वाढवून 5 टक्के इतका केला आहे. चीनने अर्थव्यवस्था सुधारणेसाठी लवकर पावले टाकली नाही तर जीडीपी दर 2029 पर्यंत घसरुन 3.3 टक्क्यांवर येण्याची भीती IMF ने वर्तविली आहे.