नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन टीकेचे धनी बनलेल्या मोदी सरकारला किंचित दिलासा मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) जीडीपी विकास दरात (GDP growth) हलकी वाढ झाली आहे. जीडीपी विकास दर 4.5 टक्क्यांवरुन 4.7 टक्क्यांवर पोहोचला आहे (GDP growth). याधीचा म्हणजे दुसऱ्या तिमाहीतील विकासदर 4.5% इतका होता. तो साडेसहा वर्षातील सर्वात निचांकी होता. आता त्यामध्ये 0.2 टक्क्यांची वाढ होऊन तो 4.7 टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षी म्हणजे 2018-19 च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकास दर 5.6 टक्के होता. मात्र यंदा तो गाठणं अशक्य झालं.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था 5.1 टक्के वेगाने पुढे सरकत आहे. मात्र हाच वेग गेल्या आर्थिक वर्षात 6.3 टक्के इतका होता.
कोरोना व्हायरसने जागतिक बाजारावर परिणाम केला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबई शेअर बाजारात आज 1448 अंकांची घट झाली. बाजार उघडताच मोठ्या उलथापालथी पाहायला मिळाल्या.
एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे जीडीपी विकास दरामध्ये झालेली किंचित वाढही मोठा दिलासा देणारी आहे. कारण सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला थोडीशी चालना मिळाल्याचं यावरुन दिसून येतं.
अनेक आर्थिक संस्थांनी विकासदर वाढणार नाही असाच अंदाज वर्तवला होता. मात्र त्याउलट निकाल दिसल्याने दिलासा मिळाला आहे.