नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : गेल्या सात व्यापारी सत्रापासून शेअर बाजार उच्चांकावर खेळत होता. नवनवीन रेकॉर्ड गाठत होता. पण आज गुरुवारी, या तेजीला लगाम लागला. शेअर बाजार उघडताच बाजार घसरला. सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला. फिनटेक फर्म वन 97 कम्युनिकेशन लिमिटेड म्हणजे Paytm च्या शेअरला त्याचा सर्वाधिक फटका बसला. बाजार उघडताच पेटीएमचे शेअर कोसळले. हे शेअर 20 टक्क्यांनी आपटले. पेटीएम शेअरचा लोअर सर्किट हिट ठरले. ट्रेडिंगच्या दरम्यान शेअर 20 टक्क्यांनी घसरुन 650.65 रुपयांच्या सर्वात कमी स्तरावर पोहचला. गेल्यावेळी हा शेअर 813.30 रुपयांवर बंद झाला होता.
का आपटला पेटीएमचा शेअर ?
20 ऑक्टोबर रोजी पेटीएमचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 998.30 रुपयांवर पोहचला. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की पेटीएममध्ये ही घसरण येण्यामागची कारणं आहे तरी काय? या घसरणीमागे कंपनीचा एक निर्णय आहे. पेटीएमने त्यांच्या पोस्टपेड कर्ज वाटपाची गती कमी केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने कडक ताकीद दिल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला. त्याचा परिणाम पेटीएमच्या शेअर्सवर दिसून येत आहे. आरबीआयने वैयक्तिक कर्जाविषयीचे नियम कडक केले आहे. अनेक मार्गदर्शक तत्वांची उजळणी फिनटेक कंपन्या, वित्तीय संस्था, बँका यांच्याकडून करुन घेतली. आरबीआयच्या या निर्णयानंतर कंपनीने 50 हजारांहून कमी वैयक्तिक कर्जप्रकरणे कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. कंपनीला नेमका यातूनच फायदा होत होता.
ब्रोकरला नाही आवडला निर्णय
अर्थात पेटीएमला हा निर्णय टाळता येणे शक्य नव्हते. पण मुळात ज्यामुळे कंपनीला जास्त फायदा होत होता, तेच व्यावसाय कमी केल्याने ब्रोकर नाराज झाले. त्यांनी हात वर केले. त्याचा परिणाम आजच्या सत्रात दिसून आला. छोट्या कर्ज प्रकरणाचा परिणाम पण कंपनीच्या व्यवसायावर दिसून येत आहे. कंपनीला त्याचा फटका बसण्याचा दाट शक्यता आहे. पण कंपनीच्या आणि काही तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, कंपनीच्या व्यवसायावर आणि नफ्यावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. पण सध्या बाजार सेटिंमेंट विरोधात असल्याने पेटीएमच्या शेअरला फटका बसला आहे.