एलॉन मस्क भारत भेटीवर; Tesla साठी पंतप्रधानांना घालणार साकडे

| Updated on: Apr 11, 2024 | 10:52 AM

ई-वाहन निर्मता कंपनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क भारत भेटीवर येत आहे. मस्कने ट्विट करत ही माहिती दिली आहे. तो या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. टेस्लाला भारतात येण्यासाठी काही सवलती हव्या आहेत. भारताने नियमांचे पालन करण्यास सांगितल्याने टेस्लाची एंट्री लांबली आहे.

एलॉन मस्क भारत भेटीवर; Tesla साठी पंतप्रधानांना घालणार साकडे
एलॉन मस्क भारत भेटीवर, मोदींना भेटणार
Follow us on

गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात Tesla या इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीला उतरायचे आहे. त्यासाठी कंपनीचा सीईओ आणि जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क याने अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पण केंद्र सरकारने टेस्लासमोर काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. त्यामुळे टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनं भारतीय रस्त्यावर उतरु शकली नाहीत. आता एलॉन मस्क भारत भेटीवर येत आहे. या दरम्यान तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. त्याने एक ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे.

याच महिन्यात भारतात

इलेक्ट्रिक कार तयार करणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचा मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क याच महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या भेटीत तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मस्क भारतात टेस्लासाठी गुंतवणूक योजनेची घोषणा करु शकतो. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मस्क भारत भेटीवर येत आहे. त्याच्यासोबत कंपनीचे इतर अधिकारी पण असतील.

हे सुद्धा वाचा

अगोदरच ठरवला होता प्लॅन

गेल्यावर्षी जून महिन्यात पंतप्रधान मोदी हे अमेरिकन दौऱ्यावर होते. त्यावेळी मस्क याने त्यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये चर्चा पण झाली. त्यावेळीच मस्क याने 2024 मध्ये भारत भेटीचे नियोजन केले होते. तर भारतात लवकरच टेस्लाची इलेक्ट्रिक कार धावणार असल्याचा दावा केला होता. टेस्ला दीर्घकाळापासून भारतीय बाजारात प्रवेशासाठी झटत आहे. पण काही अटी आणि शर्तींमुळे टेस्लाची एंट्री लांबणीवर पडली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी धोरण

मस्क भारत भेटीवर येण्यापूर्वीच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक खास धोरण जाहीर केले आहे. त्यातंर्गत देशात कमीत कमी 50 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनाच आयात शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. तसेच या कंपन्यांना स्थानिक पुरवठादारांकडून माल खरेदी करावा लागणार आहे. जगातील मोठं-मोठ्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी काही सवलती पण जाहीर करण्यात आल्या आहेत.

पुण्यात कंपनीचे ऑफिस

भारतात इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेशासाठी टेस्लाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यात कार्यालयासाठी जागा शोधली. पंचशील बिझनेस पार्कमध्ये कार्यालय (Elon Musk Tesla Office) भाडे तत्वावर घेतले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांशी चर्चेनंतर टेस्लाने हे पाऊल टाकले. कंपनीच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक कार विक्रीबाबत टेस्ला आग्रही असल्याचे स्पष्ट होते.