नवी दिल्ली : देशासाठी आजचा 14 जुलै हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. चंद्रयान-3 ला ( Chandrayaan – 3 ) घेऊन महाकाय अग्निबाण आकाशात झेपावताच देशभरात टाळ्यांचा कडकटाड झाला. चार वर्षांपूर्वी थोडक्यात चुकलेल्या सॉफ्ट लॅंडींग भरपाई यंदा करायची या इराद्याने चांद्रयान अवकाशात दुपारी झेपावले. परंतू तुम्हाला कल्पना आहे का चांद्रयान-3 मोहिमेचे बहुतांश कंपोनेंट्स एका भारतीय कंपनीने तयार केले आहेत. या कंपनीच्या प्रमुखांनी आम्हाला याबद्दल गर्व वाटत असल्याचे म्हटले आहे.
चंद्रयान-3 चे दुपारी 2.35 वाजता ठरल्याप्रमाणे श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन केंद्रातून LMV 3 – M4या रॉकेट प्रक्षेपकाद्वारे अवकाशात उड्डाण झाले. आता 45 दिवसानंतर प्रत्यक्षात चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग केले जाईल. या चांद्रयान-3 मधील बहुतांश उपकरणे उद्योग समुह गोदरेज कंपनीने तयार केली आहेत. गोदरेज एअरोस्पेसने ही किमया केली आहे. चला पाहूया कंझ्युमर प्रोडक्ट बनविणाऱ्या गोदरेज कंपनी कंपनीने नेमकी कोणती उपकरणे तयार करण्यासाठी इस्रोला मदत केली आहे.
चांद्रयान तीनच्या निमित्ताने देशाच्या सेवेसाठी आम्हाला संधी मिळाली हा आमचा गौरव मानत आहोत असे गोदरेज एअरोस्पेस कंपनीचे सहायक व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड मानेक बेहरामकानदीन यांनी म्हटले आहे. आम्ही इस्रोचे एक विश्वासार्ह साथीदार आहोत आम्ही भविष्यातही आम्ही अवकाश संशोधन आणि एअरोस्पेस सेक्टरमध्ये सहकार्य करण्यासाठी तत्पर आहोत असे बेहरामकानदीन यांनी म्हटले आहे. चंद्रयान-3 साठी गोदरेज कंपनीने अनेक उपकरणे तयार केली आहेत. यातील काही उपकरणे अतिशय महत्वाची आहेत. या रॉकेट इंजिन पासून ते थ्रस्टर इंजिनपर्यंतची उपकरणे गोदरेज एअरोस्पेसने तयार केले आहेत.
चांद्रयान – 3 मोहिमेसाठी विकास इंजिन , CE20 आणि सॅटेलाईट थ्रस्टर मुंबईतील विक्रोळी येथील फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आले आहेत. मोहिमेच्या कोर स्टेजसाठी L110 इंजिनची निर्मिती देखील गोदरेजनेच केली आहे. चंद्रयान-1 , चंद्रयान-2 आणि मंगळ मोहिमेसाठी देखील गोदरेज एअरोस्पेस कंपनीनेच यांत्रिक सामुग्री तयार केली होती.
स्वदेशी तंत्रज्ञानाने मेक इन इंडीया या मोहिमेंतर्गत ही यंत्रसामुग्री तयार केली आहे. चंद्रयान-1 साठी गोदरेज एरोस्पेसने विकास इंजिन, थ्रस्टर्स, रिमोट सेंसिंग एंटेना सारखे महत्वपूर्ण भाग तयार केले आहेत. सूरत येथील कंपनी हिमसन इंडस्ट्रीयल सेरामिक कंपनीने देखील अंतराळात प्रचंड मोठ्या तापमानापासून सुरक्षित रहाण्यासाठी चंद्रयान-3 अनेक पार्ट्स तयार केले आहेत. कंपनीने निर्मिती केलेले SQUIBS हे 3,000 डीग्री तापमानातही कार्यक्षम रहाणार आहेत. तसेच इंदापूर येथील वालचंद इंडस्ट्रीजने देखील काही पार्ट्स तयार केले आहेत.