नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : दिवाळीचा आनंद आता दुप्पट होणार आहे. दागिन्यांची हौस, सोने-चांदी गाठिशी ठेवण्याचा आणि त्यात भर टाकण्याचा संकल्प भाव उतरल्याने पूर्ण होऊ शकतो. ऑक्टोबरमधील 4 हजार रुपयांच्या दरवाढीने अनेकांनी दिवाळीत सोने-चांदी खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. पण या आठवड्यात या रुसलेल्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीत (Gold Silver Price Today 9 November 2023) स्वस्ताई आल्याने ग्राहकांना हायसे वाटले आहे. त्यांची पावलं पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहे. धनत्रोयदशीपर्यंत घसरण कायम राहिल्यास सराफा पेठेत गर्दी उसळेल.
सोने 1650 रुपयांनी स्वस्त
गेल्या दहा ते बारा दिवसांत सोन्याने मोठा दिलासा दिला. सोने 1650 रुपयांनी स्वस्त झाले. या आठवड्यात 400 रुपयांची घसरण झाली. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी सोने 110 रुपयांनी उतरले. 5 नोव्हेंबरमध्ये बदल झाला नाही. तर 6 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 7 नोव्हेंबर रोजी 100 रुपयांची घसरण झाली. 8 नोव्हेंबर रोजी किंमती 160 रुपयांनी घसरल्या. आता 22 कॅरेट सोने 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 1700 रुपयांनी स्वस्ताई
चांदीने गेल्या आठवड्यात 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी त्यात 900 रुपयांची वाढ झाली. 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. पण नंतर चांदीने आनंदवार्ता दिली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांची स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,540 रुपये, 23 कॅरेट 60,298 रुपये, 22 कॅरेट सोने 55,455 रुपये झाले. 18 कॅरेट 45,405 रुपये, 14 कॅरेट सोने 35,416 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,209रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
ग्राहकांचा उत्साह कायम
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धनत्रयोदशीला ग्राहकांचा उत्साह कायम असेल,अशी अपेक्षा पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केली. सध्या बाजारपेठेत असलेली तेजी आणि येणारा लग्नसराईचा काळ यामुळे गेल्या वर्षीपेक्षा धनत्रयोदशीच्या दिवशी विक्रीमध्ये 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. सोन्यामध्ये आणखी वाढ होण्याआधी खरेदी करावी म्हणून ग्राहकांचा यावर्षी सोने खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग्सचा कल दिसून येत आहे. दरवर्षी भारतात धनत्रयोदशीला अंदाजे एकूण 40 टन सोन्याची विक्री होते.त्यापैकी 20 ते 25 टक्के म्हणजे 10 टन ही महाराष्ट्रात होते, अशी माहिती त्यांनी दिली.