नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली आहे. काहींनी भाव पुन्हा वधारतील म्हणून मोठी गुंतवणूक केली आहे. जुलै महिन्यात सोने-चांदी (Gold Silver Price Today) नवीन रेकॉर्ड करतील का? काही ब्रोकरेज फर्मने जुलै महिन्यासाठी पुन्हा घसरणीचा अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या मते, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यात पडझडीचे सत्र कायम असेल. सोने आणि चांदीला मोठा रेकॉर्ड करता येणार नाही. जागतिक परिस्थितीचा अंदाज पाहता, रशिया-युक्रेन युद्धाचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. त्यातच रशियाने बंडाळी मोडून काढली असली तरी धोका टळलेला नाही. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह ही केंद्रीय बँक पुन्हा व्याजदर वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घडामोडींमुळे डॉलर वधारेल. तर सोने आणि चांदी दबावाखाली असेल, असा दावा काही ब्रोकरेज फर्म करत आहे. येत्या काही दिवसांत सोने-चांदीचा मूड काय, हे स्पष्ट होईल.
मे-जूनमध्ये दिलासा
सोने मोठा टप्पा गाठेल, असा दावा करण्यात येत होता. मे महिन्यात सोने 70 हजार मनसबदार होण्याचे स्वप्न पाहत होते. तर चांदी 80,000 टप्पा ओलांडेल असा दावा करण्यात येत होता. पण मे महिन्यात दोन्ही धातूंनी माघार घेतली. कोणताच नवीन रेकॉर्ड केला नाही. दोन्ही धातूंमध्ये पडझड झाली. जून महिन्यात घसरण कायम होती. सोने तर 59,000 रुपयांपर्यंत खाली घसरले तर चांदी 70,000 रुपयांपर्यंत उतरली. जुलै महिन्यात या किंमती अजून किती घसरतात, याकडे ग्राहकांचे आणि सराफा बाजाराचे लक्ष लागले आहे.
महिन्याभरात इतकी झाली घसरण
30 जून रोजी 24 कॅरेट सोने 100 रुपयांनी वधारले. 10 ग्रॅम सोने 59,000 रुपये झाले. 1 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये होता. 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त होऊन 59,820 रुपयांवर पोहचले होते. 29 जून रोजी पुन्हा घसरण झाली. हा भाव 58,900 रुपयांवर आला होता. गुडरिटर्न्सनुसार या किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत. सोन्यात जवळपास दोन हजार रुपयांची घसरण झाली.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
30 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,055 रुपये, 23 कॅरेट 57,823 रुपये, 22 कॅरेट सोने 53,178 रुपये, 18 कॅरेट 43,541 रुपये आणि 14 कॅरेट सोने 33962 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.
चांदीचा भाव काय
जून महिन्याच्या शेवटी 30 जून रोजी चांदी किलोमागे 500 रुपयांनी घसरले. काल एक किलो चांदीचा भाव 71,400 रुपये होता. 21 जून रोजी एक किलो चांदी 73,000 रुपये होती. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर चांदीत एक हजार रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार ही किंमत आहे.