नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : सोन्याची चमक डोळे दिपवणारी आहे. सोन्याच्या दरवाढीने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. परंपरेनुसार सोन्यातील गुंतवणूक ही शुभ मानण्यात येते. पण गेल्या 10-12 वर्षात सोन्याने मोठी झेप घेतली आहे. या किंमती खिसा रिकामा करत आहेत. सोन्याची गुंतवणूक फायदेशीर ठरत असली तरी इतकी मोठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी सोन्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. प्लॅटिनम हा सोन्याला उतारा ठरत आहे. ग्राहकांची सोन्यापेक्षा प्लॅटिनम दागिन्यांना अधिक पसंती वाढली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते हा मोठा बदल आहे. कारण जनमाणसांवर सोन्याचे मोठे गारुड आहे. हा मोह एका झटक्यात संपणार नाही. पण सुरुवात झाली हे पण नसे थोडके…
शहरी भागात बदलाची चुणूक
आजही सोन्याचे दागिन्यांची परंपरा कायम आहे. सणासुदीला सोने खरेदी शुभ मानण्यात येते. लग्नसमारंभात सोन्याच्या दागिन्यांचेच महत्व आहे. पण शहरी भागात हा ट्रेंड बदलत आहे. आता प्लॅटिनमच्या दागिन्यांची चलती आहे. अनेक जण सोन्यापेक्षा प्लॅटिनमला पसंती देत आहे. ग्रामीण भागात अजून हे लोण पोहचले नाही.
सोन्याच्या किंमतींचा परिणाम
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये अशी होती. आता सोन्याचा भाव 62,629 रुपयांवर पोहचला आहे. सोने लवकरच 64,000 रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. त्यांनी प्लॅटिनमकडे मोर्चा वळवला आहे.
प्लॅटिनमचा भाव काय
प्लॅटिनम सोन्यापेक्षा स्वस्त आहे. सध्या 10 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 25 हजार रुपये आहे. सोन्याच्या किंमती यापेक्षा जवळपास अडीच पट जास्त आहेत. अनेक ज्वेलर्स आता प्लॅटिनमचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देत आहे. त्यांच्या मते, वधू आणि वर पक्षाची पहिली पसंती सोनेच आहे. पण वाढत्या किंमती लक्षात घेता अनेक जण प्लॅटिनमकडे वळाले आहे. प्लॅटिनमच्या दागिन्यांमध्ये जवळपास 25 ते 30 टक्के तेजी नोंदवल्या गेली आहे.
प्लॅटिनम दागिन्यात अधिक पर्याय
सोन्याच्या दागिन्यांपेक्षा प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या डिझाईन अधिक आहे. कमी किंमतीत प्लॅटिनम दागिन्यांमध्ये अधिक डिझाईन मिळतात. त्यामुळेच प्लॅटिनमकडे महिला ग्राहकांचा कल वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्लॅटिनम सोन्यापेक्षा स्वस्त असल्याने हे पण त्यातील गुंतवणुकीचे एक महत्वाचे कारण ठरले आहे.