सोन्यासारख्या व्यवसायाला सध्या गालबोट लागलं आहे ते सरकारच्या धोरणाचं. केंद्र सरकारने (Central Government) गंगाजळीच्या हिशोबाने सोने आयातीवर (Gold Import) चाप ओढला आहे. सोन्यावर 5 टक्के आयात शुल्क (Import Tax) लावले आहे. सोन्यावर यापूर्वी 7.5 टक्के आयात शुल्क होते. आता त्यात वाढ होऊन ते 12.5 टक्के होणार आहे. या घडामोडींचा परिणाम बाजारात दिसून आला. सोन्याच्या भावाने उसळी घेतली. एमसीएस्कवर (MCX) सोन्याच्या दरात 2.56 टक्क्यांची तेजी दिसून आली. सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 51,917 रुपयांवर बंद झाले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डमध्ये 0.88 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. व्यापारी सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 1784 डॉलरच्या निचांकी स्तरावर पोहचल्या. सध्या सोन्याचे दर सहा महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहचले हे विशेष. पण भारतात सोन्याच्या किंमतीत आता वाढ होणार आहे.
IIFL सिक्युरिटीजचे कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी सांगितले की ,गेल्या आठवड्यात MCX वर चांदीच्या किंमतीत 3.71 टक्क्यांची घसरण झाली. चांदीची 58,182 रुपयांवर विक्री झाली. आठवड्याच्या व्यापारी सत्रात चांदीचे दर 57,537 रुपयांपर्यंत घसरले. ही गेल्या दोन वर्षांतील सर्वात जास्त घसरण आहे. स्पॉट मार्केटमध्ये चांदीच्या दराने 20 डॉलरचा पातळी तोडली आहे. चांदीचे भाव 19.80 डॉलर प्रति औसवर बंद झाले. मंदीमुळे सोने चांदीच्या मागणी घटली आहे.
अनुज गुप्ता यांच्या माहितीनुसार, अमेरिकन फेडरल बँकेने आक्रमक धोरण अंगिकारले आहे. बँकेने व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्यावर दबाव आला आहे. महागाई त्यामुळे वाढली आहे. अशातच जर बेरोजगारी वाढली तर त्याचा सरळ अर्थ अमेरिका मंदीच्या फे-यात आहे असा निघतो. जून महिन्यात अमेरिकन उत्पादन आघाडीवर सर्वात निच्चांकी घसरण नोंदवण्यात आली आहे. दोन वर्षांतली ही सर्वात निच्चांकी घसरण आहे. जून महिन्यात ग्राहक निर्देशकांतही कमालीची घसरण झाली आहे. 16 महिन्यांच्या सर्वात निचांकी स्तरावर हा निर्देशांक घसरला आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम सोन्यावर होईल आणि सोन्याचे भाव तेजीने वाढतील. परंतु, गुंतवणूकदार हा अंदाज नाकारत आहेत. अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदर वाढवल्याने सोन्याच्या किंमतींवर सध्या दबाव आला आहे.
या आठवड्यात गोल्ड आऊटलूक आणि ट्रेडिंग कॉलनुसार, वायदे बाजारात सोन्याचे दर 51,200 रुपये असतील. या किंमतीवर ते खरेदी करावे. तर 50,600 रुपये स्टॉप लॉस ठेवावा. या आठवड्यात सोन्यासाठी 52,500 रुपयांचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. त्यानंतर 52,700 रुपये पुढचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. चांदीमध्ये अजूनही घसरण सुरुच आहे. चांदीचे दर 57,000 रुपयांपर्यंत कमी येऊ शकतात.