नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढउतार सुरु आहे. सोन्याचे भाव गडगडले म्हणून सराफा बाजारात जाणाऱ्या ग्राहकांना सोन्याचा नवीन भाव पाहून गोंधळ उडत आहे. सोने सध्या ग्राहकांची फिरकी घेत आहे. तिकडे चांदीचे मात्र एकला चलो रे धोरण सुरु आहे. चांदीत अनेक दिवसांपासून घसरणीचे सत्र कायम आहे. मध्यंतरी मामूली दरवाढ दिसली. 20 मे रोजीच चांदीने जोरदार उसळी घेतली होती. पण गेल्या एक महिन्यांच्या जवळपास चांदीतील किंमतींची कपात कायम आहे. आज सोने-चांदीच्या (Gold Silver Price) तेजीला ब्रेक लागला आहे. काल दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती वधारल्या होत्या. आज काय भाव आहे, हे माहिती आहे का?
बुधवारी घेतली फिरकी
24 मे 2023 रोजी सोने-चांदीने घसरणीला ब्रेक लावला. सकाळच्या सत्रात भावात मोठा बदल झाला नव्हता. त्यामुळे सोने-चांदी वधरणार नाही, असा अंदाज होता. पण सोन्याने सराफा बाजाराची चांगलीच फिरकी घेतली. प्रति 10 ग्रॅममागे सोन्यात 250-260 रुपयांची दरवाढ झाली. 22 कॅरेटचा भाव 56,400 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,510 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
आजचा भाव काय
goodreturns नुसार आज सोन्यात 450-490 रुपयांची घसरण झाली. ही सकाळच्या सत्रातील घसरण आहे.
22 कॅरेटचा भाव 55,950 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, सकाळच्या सत्रात भावात घसरण दिसून आली. IBJA नुसार, बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,680 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,583 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
मंगळवारी झाली होती घसरण
goodreturns नुसार मंगळवारी 22 कॅरेटच्या भावात 290 रुपयांची घसरण झाली होती.24 कॅरेट सोन्यात 310 रुपयांची घसरण झाली होती. त्यापूर्वी 20 मे रोजी अनुक्रमे 500 रुपयांची आणि 550 रुपयांची दरवाढ झाली होती. तर चांदीत आज पुन्हा हजार रुपयांची घसरण होऊन भाव 73,050 रुपये किलो झाला आहे.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,680 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,437 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,583 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,510 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.