नवी दिल्ली : सोन्या-चांदीने (Gold-Silver Price) आज पुन्हा नवीन इतिहास रचला. आजच्या भावाने कोविड पूर्व काळातील (Pre Covid) भावाची आठवण करुन दिली. कोविडनंतर सोन्याची झळाळी कमी झाली होती. पण या दिवाळीनंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वधरल्या आहेत. चांदीच्या किंमतींमध्येही जोरदार तेजी दिसून आली. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतीत 2600 रुपये प्रति 10 ग्रॅमची वृद्धी दिसून आली. तर चांदीत 6000 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त वाढ झाली. वायदे बाजारासह (MCX) सराफा बाजारात सोन्याने नवीन विक्रम रचला.
सोन्या-चांदीचे भाव एका विक्रमी स्तरावर आहेत. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किंमती 56,200 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहचल्या होत्या. शुक्रवारी दुपारी वायदे बाजारात जवळपास 12 वाजता गोल्ड फ्युचरवर भावात वृद्धी झाली नाही.
वायदे बाजारात सोने 53893 रुपये प्रति 10 ग्रॅम भावाने व्यापार करत होते. तर चांदीत 496 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचा भाव 65905 रुपये प्रति किलोवर पोहचला. यापूर्वी सोने 53893 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 65409 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.
सराफा बाजारात इंडिया बुलियंस असोसिएशनच्या (https://ibjarates.com) नवीन किंमतीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 430 रुपयांची वृद्धी दिसून आली. सोन्याचा भाव 53611 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला.
तर 999 शुद्ध चांदी 1483 रुपयांच्या तेजीसह 64686 रुपये प्रति किलोवर पोहचली. 23 कॅरेट सोन्याचा भाव 53396 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 49108 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 18 कॅरेट सोने 40208 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
गुरुवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात जबरदस्त तेजी दिसून आली. याठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत जोरदार वृद्धी दिसून आली. नोव्हेंबर महिन्यात सोन्यात जवळपास 5 टक्के तर चांदीत 10 टक्के वाढ दिसून आली.