नवी दिल्ली | 5 नोव्हेंबर 2023 : आता आनंदाची, उत्साहाची उधळण होणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. सर्वांची एकच लगबग सुरु झाली आहे. बाजारात गर्दी उसळली आहे. सराफा बाजार पण फुलला आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक आठवणीत रहावा यासाठी दागदागिने खरेदीकडे ओढा वाढला आहे. काही जण गुंतवणूक म्हणून सोन्याचा तुकडा गाठीशी ठेवतात. सोन्याने गेल्या महिन्यापासून आघाडी घेतली आहे. तर चांदीने पण भरारी घेतली. या महिन्यात सोने-चांदीत (Gold Silver Price Today 5 November 2023) चढउतार दिसून येत आहे. सोने स्वस्त झाले तर चांदीच्या किंमती वधारल्या आहेत. काय आहेत भाव?
सोने उतरले
गेल्या महिन्याच्या शेवटी आणि या महिन्याच्या सुरुवातीला 1020 रुपयांनी सोने उतरले. 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. 3 नोव्हेंबर रोजी त्यात 100 रुपयांची वाढ झाली. 4 नोव्हेंबर रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची महागाईला फोडणी
चांदीत सातत्याने घसरण सुरु होती. त्याला ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी त्यात 900 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,075 रुपये, 23 कॅरेट 60,830 रुपये, 22 कॅरेट सोने 55,945 रुपये झाले. 18 कॅरेट 45,806 रुपये, 14 कॅरेट सोने 35,729 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 71,771 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.