नवी दिल्ली | 1 February 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या थोड्याच वेळात अंतरिम बजेट सादर करतील. त्या टीमसह अर्थमंत्रालयात पोहचल्या आहेत. बजेटनंतर सोने-चांदीच्या किंमतीत काय बदल होतो, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी बजेटपूर्वी किंमतीत घसरण झाली होती. तर दिवाळी 2023 नंतर मौल्यवान धातूच्या किंमती भडकल्या होत्या. डिसेंबर महिन्यात तर दोन्ही धातूंनी दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला होता. या जानेवारी महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today 1 February 2024) घसरण दिसून आली. आता बजेटनंतर या मौल्यवान धातूच्या किंमतीत काय बदल होतो, हे समोर येईलच.
सोने झाले महाग
गेल्यावर्षीच्या तुलनेत या जानेवारी महिन्यात सोन्यात स्वस्ताई आली. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. तर या दोन दिवसांत सोन्यात 320 रुपयांची वाढ झाली. 29 जानेवारीला 100 तर 30 जानेवारी रोजी 220 रुपयांची वाढ झाली. 31 जानेवारी रोजी भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी लकाकली
जानेवारीत चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. चांदीत 4400 रुपयांची घसरण आली. पण गेल्या आठवड्यात 1000 रुपयांची तर या आठवड्यात 500 रुपयांची वाढ झाली. सोमवारी 29 जानेवारी रोजी 200 रुपयांची तर 30 जानेवारी रोजी 300 रुपयांची वाढ झाली. 31 जानेवारी रोजी किंमती स्थिर होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने महागले तर चांदीची किंमत उतरली. 24 कॅरेट सोने 62,685 रुपये, 23 कॅरेट 62434 रुपये, 22 कॅरेट सोने 57,420 रुपये झाले. 18 कॅरेट 47,014 रुपये, 14 कॅरेट सोने 36,671 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,668 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.