सोने आणि चांदीच्या किंमतींकडे दुर्लक्ष करत ग्राहकांनी सराफा बाजार फुलून गेला आहे. बाजारात पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. दीपोत्सवात सोने खरेदी शुभ मानण्यात येते. दरवाढीकडे दुर्लक्ष करत अनेक ग्राहकांनी किडूकमिडूक का असेना या मौल्यवान धातुची खरेदी केली. दिवाळीच्या काळात सोने 82 हजारांपर्यंत वधारणार असा अंदाज यापूर्वीच तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, लक्ष्मी पूजनाला सोन्याने आज अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी केली. सोन्याने धमाका केला. सोने 81 हजारांच्या घरात पोहचले. तर त्याचवेळी चांदीने माघार घेतली. चांदीच्या किंमतीत मोठा बदल दिसला नाही. आता सराफा बाजारात अशा आहेत किंमती? (Gold Silver Price Today 1 November 2024)
सोन्याची ‘दिवाळी’
सोन्याची प्रत्येक दिवाळीला दिवाळी होते. पण यंदा सोन्याने मोठा पल्ला गाठला आहे. गेल्या दहा वर्षांत 2014 नंतर देशात सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. मोदी सरकार आल्यापासून सोन्याच्या किंमतींमध्ये अचानक उसळी दिसून आली. ती अजूनही कायम आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले. 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने अनुक्रमे 600 आणि 700 रुपयांची भरारी घेतली. 31 ऑक्टोबर रोजी त्यात 170 रूपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा फटका फुसका
मागील आठवड्यात चांदी 3 हजार रुपयांनी उसळली तर त्यात 6,000 रुपयांची घसरण झाली. तर या 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी प्रत्येकी 1 हजारांची दरवाढ झाली. 31 ऑक्टोबरच्या किंमती अपडेट झाल्या नाहीत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,581, 23 कॅरेट 79,262, 22 कॅरेट सोने 72,896 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 59,686 रुपये, 14 कॅरेट सोने 46,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,040 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.