नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचे (Israel-Palestine Conflict) परिणाम सराफा बाजारावर दिसून आला आहे. गेल्या चारच दिवसात दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याने तर या युद्धात जागतिक पातळीवर निर्णायक भूमिका घेतली आहे. इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाची सुरुवात गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री झाली. शनिवारपासून त्याची तीव्रता वाढली. भारतात सोने-चांदीचा निच्चांकी प्रवास सुरु झाला असताना या युद्धाने सर्व समीकरणंच बदलून टाकली. सोने-चांदीत मोठी वाढ झाली. देशात सध्या पितृपक्षामुळे सराफा बाजारातील गिऱ्हाईकी मंदावली आहे. पितृपक्षात नवीन खरेदी न करण्याची मान्यता आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या रोडावली होती. भावात मोठी घसरण झाली होती. पण आता सोने-चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Rate Today 10 October 2023) चार दिवसांत मोठा पल्ला गाठला आहे.
चार दिवसात सोन्याची झेप
गुडरिटर्न्सनुसार, शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सोन्यात अचानक तेजी आली. युद्धाचे परिणाम लागलीच दिसून आले. 6 ऑक्टोबर रोजी किंमतीत 70 रुपयांनी वाढ झाली. शनिवारी 310 रुपये, 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची, 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांची वाढ झाली. या चार दिवासात 1,000 रुपयांची वाढ झाली. त्यापूर्वी सोन्यात सातत्याने घसरणीचे सत्र सुरु होते. सप्टेंबर महिन्यात 15 ते 19 सप्टेंबर या कालावधीत किंमती वधारल्या होत्या. नंतरच्या सत्रात भाव घसरले. 22 कॅरेट सोने 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,350 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीत मोठी वाढ
सप्टेंबर महिन्यात चांदीला चमक दाखवता आली नव्हती. चांदीत मोठी पडझड झाली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सत्रात पण हाच क्रम सुरु होता. 2 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 3 ऑक्टोबर रोजी चांदी 2000 रुपयांची पडझड दिसली. 4 ऑक्टोबरला 300 रुपयांनी भाव घसरले. 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 400 आणि 500 रुपयांनी किंमती घसरल्या. पण 7 ऑक्टोबर रोजी चित्र पालटले. युद्धानंतर चांदी उसळली. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,332 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,102 रुपये, 22 कॅरेट सोने 52516 रुपये, 18 कॅरेट 42,999 रुपये, 14 कॅरेट सोने 33,539 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 68,493 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.